रेशनच्या नावावर निकृष्ट धान्य वाटप
गोंदिया : जिल्ह्यातील नागरिकांना रेशन दुकानातून निकृष्ट दर्जाचे धान्य वितरित केले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. या धान्यात मोठ्या प्रमाणात खडे, कचरा व कुशा आढळत असून, गहू व तांदळामध्ये अळ्या, कीड तसेच दुर्गंधीयुक्त कण असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. ‘गरिबांनी गहू खावा की किडे?’ असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
नियतकालिक धान्य वितरण व्यवस्थेत गंभीर त्रुटी असल्याचेही उघड झाले आहे. काही कार्डधारकांना किडलेला गहू व तांदूळ वितरित करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. धान्यात पांढरा फुफाटा, अळ्या आणि सोनकिड्यांचा प्रादुर्भाव स्पष्टपणे दिसत असल्याचे नागरिकांनी सांगितले. सध्या रेशन धान्य शिधापत्रिकाधारक कुटुंबाला प्रतिकार्ड ३५ किलो धान्य वितरित केले जाते. धान्याच्या वाटपामध्ये २० किलो तांदूळ आणि १५ किलो गहू यांचा समावेश असतो. गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना अन्नसुरक्षा उपलब्ध करून देण्यासाठी योजना महत्त्वाची भूमिका बजावते.
अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
तसेच प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत प्रत्येक सदस्याला प्रतिमहा ५ किलो धान्य दिले जाते, ज्यामध्ये ३ किलो तांदूळ व २ किलो गहू यांचा समावेश असतो. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित पुरवठादारांवर कठोर कारवाई करावी, तसेच जबाबदार अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.







