रोहयो महासंचालक नंदकुमार यांची धमदीटोला येथील ‘ग्रुप ऑफ ग्रामसभा’ कार्यालयाला भेट

देवरी : महाराष्ट्र राज्याचे रोहयो महासंचालक नंदकुमार यांनी नुकतीच ग्रुप ऑफ ग्रामसभा कार्यालय, धमदीटोला येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी वन हक्क कायद्यांतर्गत क्षेत्रात सुरू असलेल्या विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करून उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले.

सामुदायिक वन हक्कांतर्गत आर्थिक प्रगती

सविस्तर वृत्त असे की, वन हक्क कायदा अधिनियम २००६, नियम २००८ व सुधारित नियम २०१२ अन्वये गठीत सामूहिक वन हक्क प्राप्त ग्रामसभांनी ‘विदर्भ निसर्ग संरक्षण संस्थेच्या’ मार्गदर्शनाखाली २०१३ पासून एकत्र येत ३२ ग्रामसभांचे मिळून ‘ग्रुप ऑफ ग्रामसभा’ गठीत केली आहे. या माध्यमातून वन हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून, तेंदूपत्ता संकलन व इतर वन गौण उपज संकलनातून गावांचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यास मोठी मदत झाली आहे. यासोबतच, सामूहिक वन हक्क प्राप्त क्षेत्रातील तलावांमध्ये मत्स्य व्यवसायाची सुरुवात करण्यात आली आहे. विदर्भ निसर्ग संरक्षण संस्थेच्या वतीने तलाव खोलीकरणाचे काम करण्यात आले असून, यामुळे गावाच्या आर्थिक उत्पन्नात भर पडत आहे.

बांबू लागवड आणि पायाभूत सुविधांचा विकास

धमदीटोला येथील सामूहिक वन हक्क क्षेत्रात ६० हेक्टर आर जमिनीवर बांबू लागवड करण्यात आली आहे. यामुळे भविष्यात वन हक्क धारकांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

ग्रुप ऑफ ग्रामसभेने स्वतःच्या निधीतून १ हेक्टर आर जमीन खरेदी करून त्यावर ‘अभ्यास केंद्राचे’ बांधकाम पूर्ण केले आहे. तसेच मानव विकास मिशन अंतर्गत १८ लाख रुपये किमतीचे गोदाम आणि १० लाख रुपये निधीच्या तेल घाणी युनिटचे बांधकाम देखील करण्यात आले आहे. महासंचालकांनी या सर्व कामांची आणि बांबू रोपवनाची प्रत्यक्ष पाहणी करून संपूर्ण प्रक्रिया समजून घेतली.

महासंचालकांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन

या प्रसंगी मार्गदर्शन करताना मा. नंदकुमार साहेब म्हणाले की, VB GRAMG (व्हि.बी. ग्रामजी) या कायद्याचा/प्रणालीचा वापर करून रोहयो कामांचे जास्तीत जास्त नियोजन करावे. पाण्याचे स्रोत वाढवून मत्स्य पालन व शेती कशी पिकीवता येईल यावर भर दिला पाहिजे. जेणेकरून प्रत्येक व्यक्तीचे आणि कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न वाढेल, प्रत्येक जण आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल आणि गाव विकसित होईल, याकडे ग्रामस्थांनी लक्ष द्यावे असे आवाहन त्यांनी केले.

प्रमुख उपस्थितांची उपस्थिती

या दौऱ्यादरम्यान महासंचालकांसोबत बांबू विषय तज्ज्ञ मा. करपे सर, हैदराबाद EMIS मंडाडे सर (आय.एन.आर.एस.बी), मा. आर्यन सर, मा. बोपेचे सर, मा. खरवडे सर, तसेच ए.पी.ओ. पंचायत समितीचे मा. गौतम साखरे सर उपस्थित होते.

तसेच स्थानिक पातळीवरून मा. बोदले जी, मा. रविजी अंबादे (ग्रामसेवक, मिसपिरी), मा. धन्नालाल सयाम (रोजगार सेवक, ग्रामपंचायत मिसपिरी), समितीचे पदाधिकारी मा. नारायण जी सलामे (अध्यक्ष, ग्रुप ऑफ ग्रामसभा), मा. गोपाल कुमेटी (माजी अध्यक्ष), ब्रिजलाल राऊत (सचिव), प्रकाश गंगाकचूर, जगन सलामे, खेमचंद सलामे, मुकेश मडावी, सौ. सरिता भोयर, मा. जयराम केराम, संतोष भोयर, परसराम मरकाम, नेताराम हिडामी, प्रकाश सयाम, अंताराम मडावी, सुरेश दर्रो, विश्वनाथ मडावी, रामसू पदा, प्यारेलाल काटेंगा, श्यामराव नेताम, श्यामराव कुमेटी, केवलराम मडावी, राजेश मस्के, मनोहर वाल्दे इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते.

सूत्रसंचालन व आभार:

कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन तुलाराम उईके यांनी केले, तर उपस्थितांचे आभार जगन सलामे यांनी मानले.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें