देवरी : बेलारगोंदी परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी बांधवांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार संजय पुराम यांनी बेलारगोंदी येथील शेतकऱ्यांच्या शेताला प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.
यावेळी पदर सिताराम गावळ(शेडेपार) तसेच उत्तम आनंदराव लांजेवार यांच्या शेतावर जाऊन पिकांच्या नुकसानीची माहिती घेण्यात आली. अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी बांधवांवर आर्थिक संकट कोसळले असून अनेक शेतकरी हवालदिल झाले आहेत.
आमदार संजय पुराम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामा करण्याच्या सूचना देत, बाधित शेतकऱ्यांना योग्य व त्वरित नुकसान भरपाई मिळावी यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. तसेच शासनाने या परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी ठाम मागणीही त्यांनी केली.
“शेतकरी हा देशाचा कणा आहे. त्याच्या अडचणीच्या काळात त्याच्या पाठीशी उभे राहणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे,” असे मत आमदार संजय पुराम यांनी व्यक्त केले.







