आगीत 500 केळीची झाडे जळून खाक; शेतकऱ्याचे मोठे नुकसान

सडक अर्जुनी : तालुक्यातील बामणी खडकी येथील प्रगतशील शेतकरी मोहन तवाडे यांच्या शेतात जंगलातील वणव्यामुळे भीषण आग लागून केळीचा बगीचा जळून खाक झाला आहे. देवपायली परिसरातील जंगलात लागलेला वणवा शेतशिवारात शिरल्याने सुमारे ५०० केळीची झाडे पूर्णतः नष्ट झाली आहे. यामुळे शेतकऱ्याचे अंदाजे दीड ते दोन लाख रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

सविस्तर असे की, जंगलात लागलेला हा वणवा हळूहळू पसरत शेतजमिनीपर्यंत पोहोचला. मात्र, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी वेळेवरदखल न घेतल्याने आणि आग विझवण्यासाठी कोणतेही प्रयत्न न केल्याने ही आग अधिक भीषण झाली, असा थेट आरोप शेतकरीमोहन तवाडे यांनी केला आहे. या आगीच्या भक्ष्यस्थानी केवळ केळीची झाडेच आली नाहीत, तर शेतात बसवलेली सुमारे १००० मीटर ड्रीप लाईन आणि १००० मीटर मल्चिंग पेपरही जळून खाक झाले आहे. वर्षभर मेहनत करून जोपासलेला केळीचा बगीचा डोळ्यादेखत जळताना पाहून तवाडे कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळले आहे.

वणव्यामुळे तोंडात आलेला घास हिरावला गेल्याने परिसरातीलशेतकऱ्यांमध्ये वनविभागाच्या कार्यक्षमतेवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. निष्काळजीपणा करणाऱ्या संबंधित वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. पीडित शेतकरी मोहन तवाडे यांनी शासनाकडे या घटनेचा तातडीने पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें