वंदे मातरम’ला दीडशे वर्ष, देवरीचे क्रीडासंकुल गजबजणार देशभक्तीने

भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील अत्यंत महत्त्वपूर्ण गीत ‘वंदे मातरम’ला ७ नोव्हेंबरला १५० वर्षे पूर्ण होणार आहेत

देवरी : (प्रहार टाईम्स )भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील अत्यंत महत्त्वपूर्ण गीत ‘वंदे मातरम’ला ७ नोव्हेंबरला १५० वर्षे पूर्ण होणार आहेत. यानिमित्ताने राज्याच्या सांस्कृतिक विभागातर्फे विविध शासकीय आणि सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहे. हे गीत स्वातंत्र्य संग्रामातील एक जाज्वल्य प्रतीक बनले असून, त्याचे महत्त्व भारतीय जनतेला नेहमीच प्रेरणा देणारे ठरले आहे. यानिमित्तान सकाळी ९.५० वाजता सामूहिक वंदे मातरम गीत गायन होणार असून समस्त नागरिकांनी या उपक्रमाचा भाग बनावा असे आवाहन करण्यात आले आहे.

यासंदर्भात राज्य शासनाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार ‘वंदे मातरम’ हे गीत सर्वप्रथम बंकिम चंद्र चट्टोपाध्याय यांच्या ‘आनंदमठ’ कादंबरीतून ७ नोव्हेंबर १८७५ रोजी प्रसिद्ध झाले. तेव्हापासून हे गीत भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचा गजर बनले. १८९६ मध्ये रवींद्रनाथ ठाकुर यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात हे गीत गायले गेले. त्यानंतर ते अधिकच लोकप्रिय झाले. विशेष म्हणजे, १९०५ मध्ये बंगालच्या फाळणीविरोधात ‘वंदे मातरम’ हे गीत एका महत्त्वाच्या साधनासारखे वापरले गेले. २४ जानेवारी, १९५० रोजी डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी संविधान सभेत निवेदन करताना स्वातंत्र्य लढ्यातील ‘वंदे मातरम’चे महत्त्व लक्षात घेता त्याला राष्ट्रगीत ‘जन गण मन’ प्रमाणेच दर्जा असेल आणि तितकाच सन्मान केला जाईल, असे म्हटले होते. तेंव्हापासून ‘वंदे मातरम ’ला राष्ट्रगीताप्रमाणेच सन्मान प्राप्त झाला.

वंदे मातरमच्या १५० व्या वर्धापनदिनानिमित्त, राज्य सरकारने विविध सांस्कृतिक, शैक्षणिक, आणि क्रीडात्मक उपक्रम राबवण्याची घोषणा केली आहे. यासाठी राज्यभरातील जिल्ह्यात एक विशेष समिती गठित केली आहे. समितीच्या सदस्यांमध्ये जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, शिक्षण अधिकारी, क्रीडा अधिकारी यांचा समावेश असून, यांचे प्रमुख कार्य ‘वंदे मातरम’च्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वाबद्दल जनजागृती करणे, विविध शालेय व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे, तसेच राष्ट्रीय एकतेचे प्रतीक म्हणून ‘वंदे मातरम’ ला अधिक प्रभावीपणे समजून घ्यायला मदत करणे असे आहे. राज्य सरकारने यासंदर्भात राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाने ३१ ऑक्टोबरला शासन निर्णय जारी केला आहे. त्यानुसार हे उपक्रम ७ नोव्हेंबर २०२५ पासून सुरु होऊन पुढील एक वर्ष राबवले जातील. विविध सरकारी आणि खासगी संस्था यामध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहित केली जातील, तसेच ‘वंदे मातरम’च्या गजरात एकजुटीचा संदेश दिला जाईल.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें