‘यू-डायस’ क्रमांकही गोठवणार ? १ ते ५ पटसंख्या असलेल्या शाळांचे समूह शाळांत होणार रूपांतर
केंद्र सरकारने मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा २००९ साली अमलात आणून ‘गाव तेथे शाळा’ हे धोरण राबवले. राज्य शासनाकडून कमी पटसंख्येच्या शाळा बंद करणार नसल्याचे वारंवार सांगितले जात असताना १ ते ५ पटसंख्या व एकाच परिसरातील जिल्हा परिषद शाळांचे एकत्रीकरण करून समूह शाळा करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला. या निर्णयामुळे राज्यातील १,७३४ शाळांना कायमचे टाळे लागणार असल्याने हजारो विद्यार्थ्यांवर प्राथमिक शिक्षणासाठी पायपीट करण्याची नामुष्की ओढवणार आहे. शाळा बंद होणार असल्याने अतिरिक्त शिक्षकांचे इतरत्र समायोजन होणार असल्याने शिक्षकांनाही गैरसोयींचा सामना करावा लागणार आहे..
गाव, वाडी, वस्ती, तांडा येथील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय उपलब्ध झाली. मात्र राज्यात १ ते ५ पटसंख्येच्या १,७३४, ६ ते १० पटसंख्या असलेल्या ३,१३७ तर १० ते २० पटसंख्या असलेल्या ९,९१२ शाळा आहेत. या शाळांतील विद्यार्थी संख्या कमी असल्याने शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. २० पटसंख्यापर्यंतच्या शाळा बंद करून तेथील विद्यार्थ्याना लगतच्या शाळेत प्रवेशित करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. मात्र या निर्णयाला विरोध झाल्याने मागील तीन वर्षापासून शाळा बंद करण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली होती.
‘यू-डायस’ क्रमांकही गोठवणार ?
कमी पटसंख्येच्या शाळा बंद करून या शाळांचे समूह शाळांमध्ये रूपांतर केल्या जाणार आहे. शाळा बंद केल्यामुळे समावेश झालेल्या विद्यार्थ्यांना वाहतूक भत्ता दरमहा ६०० रुपये दिले जाणार आहेत. यामुळे बंद शाळांचा ‘यू-डायस’ क्रमांकही रद्द होईल.









