लाखनीचा आठवडी बाजार कधी सुरू होणार?
अजिंक्य भांडारकर / विशेष प्रतिनिधी
लाखनी 19: स्थानिक आठवडी बाजार लॉकडाऊनमुळे गत सात महिन्यांपासून बंद आहे. या बाजारावर अवलंबून असलेल्या छोट्या विक्रेत्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यामुळे येथील आठवडी बाजार कधी सुरू होणार? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था ब-याच अंशी आठवडी बाजारावर अवलंबून असते. बाजाराच्या उलाढालीवर अनेकांच्या संसाराचा गाडा चालतो. अशातच कोरोना महामारीमुळे संपूर्ण देश ठप्प झाला. परिणामी लाखनीचा आठवडी बाजार देखील बंद करण्यात आला. या निर्णयाला सात महिने लोटले असून भाजीपाला विक्रेते, मिरची विक्रेते, चहा-नाश्ता विक्रेते, अगरबत्ती विक्रेते आदी छोटे विक्रेते कसाबसा आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत.
केंद्र व राज्य सरकारने आता अनलॉक मोहीम हाती घेतली असून टप्प्याटप्प्याने सर्व क्षेत्र सुरू करण्यात येत आहेत. अशातच जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी जिल्ह्यातील आठवडी बाजार सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र यात जिल्हा परिषद अंतर्गत येणा-या आठवडी बाजारांचाच उल्लेख आहे. त्यामुळे नगरपंचायत क्षेत्रात येणा-या लाखनीच्या आठवडी बाजाराचे काय होणार? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
मंगळवारी असायची वर्दळ
लाखनीला नगरपंचायत असून हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. त्यामुळे तालुक्यातील शंभर गावातील नागरिक प्रत्येक मंगळवारी आठवडी बाजारासाठी येथे यायचे. या माध्यमातून लाखोंची उलाढाल व्हायची.
जिल्हाधिका-यांच्या आदेशात केवळ जिल्हा परिषद अंतर्गत येणा-या आठवडी बाजारांचाच उल्लेख आहे. नगर पंचायत संदर्भातील सूचना येताच बाजार सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल.
- राजेंद्र चिखलखुंदे
मुख्यधिकारी, लाखनी नगरपंचायत
जिल्हाधिकारी प्रशासनाच्या आदेश आल्यानंतर आम्ही योग्य ती काळजी घेऊन लवकरच बाजार सुरू करू.
ज्योती निखाडे
नगराध्यक्ष नगरपंचायत लाखणी