सामान्य फंड व १५ व्या वित्त आयोगाच्या निधीवर प्रश्नचिन्ह?
देवरी : तालुक्यातील ग्राम पंचायत सुरतोली येथे नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत मोठा गोंधळ उडाला. ग्रामसभेत ग्रामस्थांनी सामान्य फंड तसेच १५ व्या वित्त आयोगाच्या निधीचा लेखाजोखा मागितला असता सरपंचांनी त्याबाबत स्पष्ट माहिती देण्यास टाळाटाळ केली. सभेत ग्रामस्थांनी विचारलेल्या माहितीचे उत्तरे न मिळाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले.
ग्रामसभेत ग्रामस्थानी नाली सफाई कामकाजाचे बिल , सीसीटीव्ही खरेदी चे बिल , सुशोभीकरणावर केलेले खर्च आदी माहिती विचारली तसेच अनेकवेळा पत्रव्यवहार करून माहिती विचारली असता कुठलीही माहिती सादर न केल्याचे आरोप ठेवित आज २८ ऑगस्ट ला ग्रामसभेत मुद्दे उपस्थित केले. यावेळी कुठल्याही प्रश्नाची उत्तरे न मिळाल्याने ग्रामस्थानी संताप व्यक्त केला.
प्राप्त माहिती नुसार ग्रामस्थांनी सातत्याने लेखाजोखा देण्याची मागणी केली असतानाही सरपंचांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने ग्रामसभेतील वातावरण तापले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून सरपंचांनी कोणतीही माहिती सादर न करता भरसभेतून अचानक निघून जाण्याचा निर्णय घेतला. यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी पसरली असून, सामान्य फंड व १५ व्या वित्त आयोगाच्या निधीचा वापर पारदर्शकतेने होत आहे का, या प्रश्नचिन्हावर अधिकच चर्चा रंगली आहे. ग्रामसभेत उपस्थित गावकऱ्यांनी अशा प्रकारच्या वागणुकीचा निषेध नोंदवला आहे. या प्रकरणी जिल्हा प्रशासन आणि पंचायत समिती प्रशासनाने याकडे लक्ष देऊन आवश्यक ती चौकशी करावी, अशी मागणी ग्रामसभेतील उपस्थित ग्रामस्थांनी केली आहे.
ग्रामपंचायतीतील कामकाज खुलेपणाने पार पाडले गेले पाहिजे. ग्रामसभा हा ग्रामपंचायतीतील सर्वोच्च निर्णयाचा मंच आहे. सरपंचांनी यामध्येच उपस्थित ग्रामस्थांना उत्तर द्यायला पाहिजे परंतु कुठलेही उत्तरे न देता टाळाटाळ केली. – प्रदीप परिहार अध्यक्ष तंटा मुक्त समिती सुरतोली










