आदिवासी विद्यार्थ्यांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक; तालुक्यात चाचणी होत नसल्याने आदिवासी आश्रम शाळा व वसतीगृहे सुरु होण्यास विलंब
प्रहार टाईम्स| भुपेंद्र मस्के
गोंदिया – कोरोना संक्रमणाच्या सावटाखाली विलंबाने सुरु होणाऱ्या आदिवासी आश्रम शाळा , एकलव्य निवासी शाळा व वसतीगृहात येणाऱ्या विद्यार्थ्यांना आरटीपीसीआर चाचणी व कोविड तपासणी बंधनकारक असेल. असे आदेश प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय देवरी यांनी काढले आहे. पण देवरी आदिवासी बहुल तालुक्यात हि चाचणी बंद असल्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यी व पालकांवर वनवन भटकत पाळी आली आहे. परिक्षेच्या तारखा घोषित होऊनही आदिवासी आश्रम शाळा व वसतीगृहे अजूनही सुरू न झाल्याने आदिवासी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान होणार याला जबाबदार कोण असेल? अशी संतप्त प्रतिक्रिया आदिवासी आश्रमशाळा व वसतीगृहातील पालकांची उमटत आहे.
तालुक्यातील आरटीपीसीआर चाचणी बंद असुन वरिष्ठांना कळवुन त्वरित तोडगा काढण्याचे प्रयत्न करेन असे दुरध्वनीवर देवरी तालुका आरोग्य अधिकारी डॉ ललित कुकडे यांनी दिली आहे.
देवरी तालुक्यातील एकलव्य निवासी शाळेत ३६ विद्यार्थी उपस्थित असून उर्वरित विद्यार्थ्यांना आरटीपीसीआर चाचणी केल्याशिवाय शाळेत येता येणार नाही असे प्राचार्य संजय बोंटावार यांनी आमच्या प्रतिनिधींनीशी बोलतांना सांगितले.
तालुक्यात चाचणी होत नसल्याची अडचण व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान लक्षात घेऊन आदिवासी मुलींची आश्रमशाळा बोरगाव/बाजार येथिल मुख्याध्यापक प्राचार्य नरेंद्र भाकरे यांनी धोका पत्करून प्रवेश दिला. व स्वत: देवरी व चिचगड ला चाचणी करवून आणली हे मात्र विशेष!
एकंदर आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य टांगणीला आले असल्याचे कोरोनाकाळातील चित्र आहे.