Deori: दोन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. यामुळे नागरिाकांना उकाडा सहन करावा लागत आहे. पुढील आठवडाभर उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आकाशात ढग असूनही पाऊस नाही, त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. शनिवारी शहराच कमाल तापमान ३३.२ अंश सेल्सियस नोंदले गेले, जे सरासरीहून २.६ अंशांनी अधिक आहे. हवामान विभागानुसार, पुढील आठवडाभर उष्ण आणि दमट हवामानाचा अनुभव येणार आहे.
पावसाच्या विश्रांतीमुळे उष्णतेचा जोर वाढत चालला आहे. दिवसा उकाडा आणि रात्रीही दमटपणा यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वारंवार ढगाळ वातावरण निर्माण होत असलं, तरी पावसाचा थांग पत्ता नाही. यामुळे शेतकरी वर्गातही चिंतेचे वातावरण आहे, धान पिकासाठी आवश्यक नियमित पाऊस सध्या नाहीसा झालेला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात सध्या कोणतेही प्रभावी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत नसल्याने पावसाची गती मंदावली आहे. सध्या मान्सूनी वारे उत्तर भारताच्या दिशेने सरकले आहेत. त्यामुळे मध्य भारत आणि विदर्भातील पावसाची शक्यता अधिकच कमी झाली आहे. यामुळे ऑगस्ट महिन्यात सरासरीहून कमी पावसाची शक्यता वर्तविली जात आहे. पुढील दिवसांत काही भागांमध्ये हलक्या सरी पडू शकतात. मात्र, जोरदार किंवा सार्वत्रिक स्वरूपाच्या पावसाची शक्यता कमीच असल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे. जिल्ह्यात जून महिन्यात सरासरीच्या केवळ ५८.८ टक्के तर जुलैमध्ये सरसरीच्या १४४ टक्के पाऊस झाला. जिल्ह्यात धान रोवणीचे काम अंतिम टप्प्यात असताना पावसाच्या गैरहजेरीमुळे वरथेंबी शेतीतील धान लागवड खोळबंणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पुढील आठवडा पावसाविना
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जिल्ह्यासह विदर्भात पुढील आठवडाभर पावसाची शक्यता कमी असून, ढगाळ वातावरण आणि दमट वातावरण राहणार आहे. दरम्यान, काही भागांत विजांसह, हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उकाड्यामुळे विविध आजारात भर पडण्याची शक्यता वाढल्याने नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.









