गोंदिया : राज्यात पुन्हा एकदा पावसाच्या जोरात वाढ होण्याची शक्यता आहे. तर रायगड, रत्नागिरी, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळं प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे
प्रादेशिक हवामान विभागाच्या नागपूर केंद्राच्या वतीनं येत्या २४ तासात विदर्भामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानुसार रात्रभर पावसाने विदर्भातील अनेक शहरांमध्ये जोरदार हजेरी लावली. हवामान विभागाने गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीला पावसाचा ‘रेड अलर्ट’ दिला आहे, तर भंडारासह नागपूर, वर्धा आणि अमरावतीसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. त्यामुळं राज्यातील काही भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
रात्रीपासूनच पूर्व विदर्भातील जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू आहे. नागपूर, चंद्रपूर, भंडारा, वर्धा, गडचिरोली, गोंदिया, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यात पावसाची संततधार कायम बघायला मिळत आहे. आज सकाळपासूनच पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळं नागपुरच्या सकल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. सध्या पाण्याचा निचरा होत असल्यानं आद्यप तरी नागरिकांच्या तक्रारी पुढे आल्या नसल्या तरी देखील महानगरपालिका ‘अलर्ट मोड’ वर आहे.








