
वसुली भोवली ! गोंदियातील पोलीस अधिकाऱ्यासह पोलिस शिपाई निलंबित
पोलिस अधिक्षकांची कारवाई: फिर्यादी व आरोपीकडून वसुली भोवली
गोंदिया : फिर्यादीची तक्रार न घेता उलट धमकीवजा समज देत फिर्यादीकडून तसेच आरोपीकडून वसुली करणे एका सहाय्यक पोलिस निरीक्षक व पोलिस शिपायाच्या चांगलेच अंगलट आले आहे. या प्रकरणाला घेवून जिल्हा पोलिस अधिक्षक गोरख भामरे यांनी दोघांना निलंबित केले आहे. हे प्रकरण रामनगर पोलिस ठाण्यातील आहे. सपोनि सुमेध खोपीकर व पोशि प्रविण रहिले असे निलंबनाची कारवाई झालेल्यांची नावे आहेत.
सविस्तर असे की, नजिकच्या कुडवा येथील एका अल्पवयीन मुलीवर ९ फेब्रुवारी रोजी नराधमाकडून अत्याचार झाले. दरम्यान फिर्यादी मुलगी तक्रार करण्यासाठी रामनगर पोलिस ठाण्यात पोहोचली. यावेळी कार्यरत सपोनि खोपीकर व पोशि रहिले या दोघांनी प्रकरण डायरीत नोंद न करता त्या मुलीला उलट समज दिली. दरम्यान या प्रकरणातील आरोपीलाही बोलावून घेण्यात आले. त्यातच या प्रकरणाची माहिती ठाणेदारांना सुध्दा देण्यात आली नाही. या प्रकरणातून मुलीची बदनामी आणि आरोपीच्या कुटूंबाला कारागृहात जावे लागेल, असे धमकीवजा इशारा देण्यात आला. त्यातून फिर्यादी- आरोपीच्या नातेवाईकाकडून अनुक्रमे २५ हजार व १ लाख रूपयाची अनाधिकृत वसुली केली. हे प्रकरण रामनगरचे ठाणेदार यांच्या लक्षात येताच त्यांनी ही बाब जिल्हा पोलिस अधिक्षक भामरे यांच्या निदर्शनास आणून दिली. दरम्यान या प्रकरणाला घेवून जिल्हा पोलिस अधिक्षकांनी २२ फेब्रुवारी रोजी त्या दोघांना निलंबित केले. यामुळे पोलिस विभागात एकच खळबळ उडाली आहे.
रामनगर पोलिस ठाण्यात लैगिंक अत्याचाराला घेवून फिर्याद नोंदविण्यासाठी आलेल्या मुलीला एका अधिकारी व कर्मचाऱ्याने धमकीवजा इशारा दिला. एवढेच नव्हेतर फिर्यादीच्या भावाला खोट्या गुन्ह्यात गोवण्याची धमकी सुध्दा दिली. त्यातून फिर्यादी व आरोपीच्या नातेवाईकाकडून पैसे वसुली केली. हे प्रकरण रामनगरचे ठाणेदार यांच्या निर्देशनास आले. त्यामुळे या प्रकरणातील मुलीची फिर्याद ऐकून आरोपीविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला. प्रशिक भारतलाल लांजेवार (२३) रा. बनाथर असे आरोपीचे नाव आहे. आरोपीविरूध्द कलम ६५ (१),७५ (२), ३५१ (२), सहकलम ४,८, १२ बाल लैंगिक अत्याचार अधिनियमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास रामनगरचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.