पुराडा आश्रमशाळेत आमदार संजय पुराम मुक्कामी

देवरी:  आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळेत व शासकीय वसतिगृहामध्ये शेकडो आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, या निवासी शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे पालकत्व शाळेतील कर्मचार्‍यांवर असते. विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून त्यांना प्रत्यक्ष येणार्‍या अडचणी जाणून घेऊन, विद्यार्थ्यांमधील समन्वय साधण्यासाठी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या संकल्पनेतून ‘संवाद चिमुकल्यांशी’ अभियान 7 फेब्रुवारीला राज्यभर राबविण्यात आला. या अनुषंगाने स्थानिक आमदार संजय पुराम यांनी तालुक्यातील पुराडा आश्रमशाळेत मुक्कामी राहत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी अंतर्गत 11 शासकीय आश्रमशाळा व 19 वसतिगृह आहेत. याठिकाणी प्रकल्प कार्यालयातील अधिकारी, कर्मचार्‍यांनी मुक्कामी राहून येथील सोयी सुविधेविषयी माहिती जाणून घेत विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. अधिकार्‍यांच्या मुक्कामामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य पहावयास मिळाले. यावेळी विद्यार्थ्यांनी मनमोकळेपणाने अधिकार्‍यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या मांडल्या. काहींनी कौटुंबिक प्रश्नही विचारले.  प्रसंगी पुराम यांनी विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्न बघावीत, आपले शिक्षणही याच आश्रमशाळेमध्ये झाले आहे, आमदार होण्याचे स्वप्न बघितलं होतं ते मी आज सत्यात उतरवले, विद्यार्थ्यांनो मोठी स्वप्न बघा, ध्येय निश्चित करा, खूप मेहनत करा, यश तुम्हाला नक्कीच गवसणी घालेल, असा सल्ला त्यांनी दिला.

जिप सदस्या सविता संजय पुराम यांनी बिजेपार शासकिय आश्रमशाळेला भेट देवून विद्यार्थ्यांशी हितगूज केला. प्रकल्प अधिकारी उमेश काशीद यांनी ईळदा आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. जीवनात अनेक समस्या आहेत, समस्यांचा बाऊ न करता त्यावर मात करून प्रगती कशी करून घेता येईल याचा विचार करावा असे त्यांनी सांगून शासनाच्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना असून लाभ घेण्यास सांगीतले.  यावेळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी सायली चिखलीकर, शिरीष सोनेवाने, सुनील भुसारी यांनीही आश्रमशाळेत मुक्कामी राहत विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें