शिक्षण विभागाच ठरला मुरपार च्या विद्यार्थ्यांसाठी ‘विलेन’

त्या शिक्षकांवर मुकाअ व शिक्षणाधिकारी मेहेरबान ?

देवरी: शिक्षण हक्क कायद्यान्वये कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, याकरीता शासन कटिबध्द आहे. परंतु देवरी तालुक्यातील मुरपार जि. प. शाळेत वेगळाच प्रकार सुरू आहे. येथील कार्यरत शिक्षक सतत सुट्टीवर राहत असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखोळंबा झाला आहे. शैक्षणिक भवितव्य धोक्यात आलेले विद्यार्थी गुरुजीची आतुरतेने वाट पाहत आहेत. परंतु, मागील ७ ते ८ महिन्यांपासून त्या शिक्षकाचे दर्शन न झाल्याने शाळा पोरकी झाली आहे. हा प्रकार जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला माहिती असूनही शिक्षकाचा लाड पुरविला जात आहे. त्यामुळे मेहेरबानी दाखविण्यामागचे कारण काय? असा प्रश्न संतप्त पालक व शाळा व्यवस्थापन समितीकडून उपस्थित केला जात आहे.

देवरी तालुका आदिवासी बहुल व नक्षलग्रस्त तालुका आहे. नक्षलग्रस्त क्षेत्राच्या विकासावर शासनाचा विशेष लक्ष आहे. तळागळातील विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावे, यासाठी सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. तालुक्यातील काही शिक्षक शाळेपेक्षा संघटना आणि राजकारणाला जास्त महत्व देत पगार शासनाचा आणि काम खाजगी संघटनेचा यांधे व्यस्त आहेत. अवघड क्षेत्रात मोडत असलेल्या जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा मुरपार येथे नियुक्त असलेले शिक्षक राजु बाबुराव शेळके हे मागील अनेक महिन्यातपासून सतत बिनपगारी सुट्टी घेवून कर्तव्याला बुट्टी मारत आहेत. मुरपार शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग आहेत. शाळेची एकूण पटसंख्या ७७ आहे. पण शिक्षक नसल्याने शाळेत शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे. यापूर्वी शाळेच्या तीन शिक्षकांची बदली झाली. त्या ठिकाणी शिक्षक शेळके यांना पदस्थापना मिळाली. शाळा सुरू होताच शिक्षक शेळके हे ४ दिवस शाळेत हजर राहिले. त्यानंतर ५ जुलैपासून ते ८८ दिवसाच्या सुट्टीचा अर्ज करून बिनपगारी सुट्टीवर गेले. शिक्षकाच्या सुट्ट्या ३० सप्टेंबरला पूर्ण झाल्या आहेत. यानंतर पुन्हा शिक्षकांने ७ ऑक्टोबर रोजी शाळेत दर्शन दिले. आणि पुन्हा तीन महिन्याच्या सुट्ट्‌या काढून आल्यापावलीच परतले. त्यामुळे मुरपार जि. प. शाळेत चाललंय काय? असा प्रश्न संतप्त पालक व शाळा व्यवस्थापन समितीकडून उपस्थित केला जात आहे.

जि. प. प्रशासन आणि शिक्षणाधिकाःयाला या प्रकाराची माहिती असूनही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळ सुरू आहे. यामुळे पालकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. शिक्षक सतत सुट्ट्या घेवून कर्तव्याला बुट्टी मारत आहे. अधिकाऱ्यांकडून त्या शिक्षकाचा लाड का ? पुरविला जात आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्या शिक्षकाची सेवा द्यायची इच्छा नसेल तर त्याला पदमुक्त करून दुसऱ्या शिक्षकांची नियुक्ती करावी, अशी मागणी पालक व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

८ महिन्यांपासून निवेदनाची दखल नाही :

नक्षलग्रस्त क्षेत्रातील मुरपार जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत शिक्षकांअभावीच विद्यार्थ्यांचे ज्ञानार्जन सुरू आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याला घेवून शाळा व्यवस्थापन समिती व पालकांकडून जिल्हा परिषदेचे कर्तव्यनिष्ठ मुख्य कार्यपालन अधिकारी तथा शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते. या बाबीला ८ महिन्यांचा अवधी लोटत असतानाही मुख्य कार्यपालन अधिकारी व शिक्षण विभागाकडून साधी दखल घेण्यात आली नाही. यामुळे अधिकाऱ्यांच्या कर्तव्यनिष्ठपणा फक्त कार्यालया पुरताच मर्यादित आहे काय ? अशी चर्चा मुरपार येथे सुरू आहे.

Share