चार महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने तासिका शिक्षक 23 जानेवारी पासून रजेवर

Deori : शिक्षकांना गत चार महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने गुरुवार 23 जानेवारीपासून रजेवर गेले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसानाला सामोरे जावे लागत आहे. मानधन त्वरित देण्यात यावे, या मागणीचे निवेदन तासिका शिक्षकांनी आमदार संजय पुराम व पंचायत समिती पदाधिकार्‍यांना दिले आहे.

जिल्ह्यातील सरकारी शाळांमध्ये शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून शासनाच्या धोरणानुसार शिक्षण संस्थांच्या माध्यमातून घड्याळी तासिका शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. परंतु, या शिक्षकांचे मानधन गत चार महिन्यांपासून रखडले आहे. परिणामी त्यांना आर्थिक विवेचनेला सामोरे जावे लागत आहे. तालुक्यातील देवरी येथील जिल्हा परिषद हायस्कूल येथे कार्यरत घड्याळी तासिका शिक्षकांना ऑगस्ट 2024 पासून मानधन मिळाले नसल्याचे समोर आले आहे.

गोंदिया जिल्ह्यातील इतरही सरकारी शाळांमध्ये नियुक्त या शिक्षकांनी मानधन मिळाले नसल्याची माहिती आहे. घड्याळी तासिका शिक्षकांची दखल घेऊन त्यांना थकीत मानधन त्वरित द्यावे, अशी मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे. घड्याळी तासिका शिक्षक रजेवर राहिल्यास विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसानाला सामोरे जावे लागण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी आमदार संजय पुराम यांच्या सह काही पदाधिकारी उपस्थित होते.

Share