सहकार मंत्री बाबासाहेब पाटील गोंदियाचे नवे पालकमंत्री

गोंदिया : साखर उद्योगाचे नियंत्रण असणाऱ्या सहकार खात्याचे मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यावर गोंदियाचे पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) अहमदपूरचे (जि. लातूर) आमदार असून, ६६ वर्षांचे आहेत.

उजना (ता. अहमदपूर) येथे असलेल्या सिद्धी शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज प्रा. लि.चे ते चेअरमन आहेत. चार हजार मे. टन क्षमतेचा हा कारखाना असून, गेल्या हंगामात पाच लाख टन ऊस गाळप केले होते. कारखान्याची डिस्टिलरी ६० केएलपीडी क्षमतेची आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमधील मंत्र्यांचे खातेवाटप करण्यात आले. नागपूरमधील अधिवेशनच संपताच खातेवाटप जाहीर झाले.राज्यातील सहकार चळवळ खूप व्यापक आणि ग्रामीण महाराष्ट्राचा आर्थिक कणा असल्याने सहकार खाते अत्यंत महत्त्वाचे समजले जाते. गृह, अर्थ, नगरविकास, महसूल यांच्यानंतर सहकार खात्याचाच क्रमांक लागतो.

निवडणुकीनंतर महायुती सरकार सत्तारूढ झाल्यापासून सहकार खात्याची जबाबदारी नेमकी कोणाकडे राहणार, याबाबत सहकार आणि साखर उद्योग क्षेत्रांमध्ये कमालीची उत्सुकता लागून राहिली होती. हे खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहणार हे निश्चित होते. शिवाय ते पश्चिम महाराष्ट्रातील नेत्याकडे राहील, असा अंदाजही वर्तवला जात होता. मात्र उपमुख्यमंत्री अजितदादांनी सर्वांना धक्का देत आपले खंदे समर्थक, बाबासाहेब पाटील यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली आहे.

सहकार खाते शोभेचे खाते नसून, त्याची नाळ आर्थिक विकासाशी जोडली असल्याने, या खात्याची जबाबदारी जाणकार नेत्याकडे राहिल्यास महाराष्ट्राच्या विकासाला चालना मिळते, असा आजवरचा अनुभव आहे.श्री. पाटील हे २००९ साली पहिल्यांदा अहमदपूर मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यावेळी त्यांनी विनायकराव जाधव यांचा पराभव केला होता. २०१९ मध्ये ते पुन्हा विधानसभेवर निवडून गेले आणि २०२४ साली तिसऱ्यांदा ते मोठ्या मतांनी विजयी होत आमदार झाले.

Share