देवरीचे नवे सभापती पदासाठी अनिल बिसेन यांच्या नावाची चर्चा ?

देवरी: देवरी येथील पंचायत समिती सभापतीची निवडणूक सोमवारी (दि. २०जानेवारी)रोजी होणार आहे. सभापती पैड यावेळी सर्वसाधारणसाठी आरक्षित असल्याने विद्यमान उपसभापती अनिल बिसेन यांची सभापती पदी वर्णी निश्चित मानली जात आहे. देवरी येथील पंचायत समितीत एकूण १० सदस्य संख्या असून यात भाजपचे ६ तर काँग्रेसचे ४ सदस्य आहेत. सत्ता भाजपची असली तरी काँग्रेसच्या चार सदस्यांनी अनिल बिसेन यानांच मतदान केल्यास आश्चर्य वाटू नये.
मागील अडीच वर्षापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात आरक्षण सोडत दरम्यान सहाही पंचायत समिती सर्वसाधारणासाठी आरक्षण निघाले होते. नंतर महिला प्रवर्गासाठी चिठ्ठी टाकण्यात आली होती.तेव्हा मात्र सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी देवरी पंचायत समितीचे आरक्षण निघाले होते. सर्वसाधारण (महिला) आरक्षण असल्याने भाजपच्या अंबिका बंजार यांची सभापतिपदी तर उपसभापति पदी अनिल बिसेन यांची वर्णी लागली होती.
मागील अडीच वर्षाच्या उपसभापतिपदाच्या कारकिर्दीत अनिल बिसेन यांनी मनरेगा अंतर्गत पंचायत समितीत १८० कोटींची कामे केली आहेत तर गुरांचे ६ हजार गोठेचे निर्माण करणारी महाराष्ट्रातील एकमेव पंचायत समिती ठरली आहे. त्यामुळे आमदार संजय पुराम यांच्या विधानसभा निवडणुकीत तालुक्यात विजयी लीड घेण्यात भाजपला मदत झाली. भाजप पक्षश्रेष्ठींनी सुद्धा त्यांच्या नावाला हिरवी झेंडी दिल्याची माहिती आहे.

भाजपकडे बहुमत:

देवरी पंचायत समितीत भाजपला बहुमत आहे. त्यामुळे सभापती हा भाजपचा होणार यात शंका नाही. पंचायत समितीचे १९ वे सभापती म्हणून अनिल बिसेन यांच्या नावाची केवळ औपचारिक घोषणा होणे बाकी आहे हे विशेष.

Share