अभिमानास्पद! चिल्हाटीच्या सरपंच दिल्लीत विशेष अतिथी
प्रजासत्ताक दिन सोहळ्यात विशेष निमंत्रित
देवरी :दिल्ली येथील कर्तव्यपथ येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित सोहळ्यासाठी देवरी तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या चिल्हाटी ग्रामपंचायत येथील सरपंच पुस्तकला राजकुमार मडावी यांना केंद्र सरकार व संचालक पंचायत राज महाराष्ट्र राज्य पुणेद्वारा विशेष अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. चिल्हाटी ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी तारेश कुबडे यांच्या मार्गदर्शना खाली शासनाच्या विविध योजना या ग्रामपंचायतने उत्कृष्ठपणे राबविल्या. या सर्व उपक्रमांची केंद्र सरकारने दखल घेतली आहे.
दिल्ली येथील कर्तव्य पथकावरील कार्यक्रमास विशेष निमंत्रित म्हणून आमंत्रण सरपंच पुस्तकला मडावी यांना पाठविले आहे. त्यामुळे हा समस्त चिल्हाटी गावाचा सन्मान असल्याचे मडावी यांनी सांगितले. चिल्हाटी ग्रामपंचायतने गावात विविध लोकोपयोगी उपक्रम राबविले असून १०० टक्के करवसुली करणारी ही तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत अशी ओळख निर्माण केली आहे.
दिल्लीत होणार गौरव
शाश्वत विकास उद्दिष्टांच्या नऊ विषयांवर आणि महत्त्वाकांक्षी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये चांगले काम करणाऱ्या सरपंच म्हणून पुस्तकला मडावी यांना विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. त्या केवळ प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात सहभागी होणार नाहीत तर पंचायत राज मंत्रालयाकडून त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.