देवरी येथे राज्यस्तरीय शालेय सायकलींग रोड रेस क्रीडा स्पर्धा
देवरी : जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गोंदिया यांचे संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय सायकलींग रोड रेस क्रीडा स्पर्धेचे आयोजन तालुका क्रीडा संकुल देवरी येथे २३ ते २५ डिसेंबरला महाराष्ट्र सायकलींग असोसिएशन यांचे सहकार्याने आयोजीत केली आहे .
सदर स्पर्धेत राज्यातील आठ विभागातील ३०० मुले व मुली खेळाडू संघव्यवस्थापक सहभागी होणार आहेत. खेळाडुंची नोंदणी २३ डिसेंबर रोजी करण्यात येत असून २३ ते २५ डिसेंबर या कालावधीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या मुली खेळाडूंची निवास व्यवस्था आफताब मंगल कार्यालय देवरी व मुले खेळाडूंची निवास व्यवस्था धुकेश्वरी मंदिर हॉल देवरी येथे करण्यात आली आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे मार्फत गठीत करण्यात आलेल्या तीन सदस्यीय तांत्रिक समिती मार्फत सदर स्पर्धेमधून विजयी झालेले १४, १७, १९ वर्षाआतील मुले व मुली खेळाडू भारतीय शालेय खेल महासंघामार्फत पटणा (बिहार) येथे आयोजित होणाऱ्या राष्ट्रीय शालेय सायकलींग रोड रेस स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. दर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत २३ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता तालुका क्रीडा संकुल देवरी येथे संपन्न होणार आहे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे यांनी कळविले आहे.