सारस संवर्धनासाठी वनविभागाचे स्तुत्य उपक्रम
गोंदिया: सारसांचा जिल्हा म्हणून गोंदिया जिल्हाची ओळख आहे. सारस पक्षी प्रेमाचे, भरभराटीचे प्रतिक मानले जाते. या पक्ष्याची घटती संख्या चिंतेचा विषय असताना सारस पक्ष्यांच्या संवर्धनाबाबतच्या एका स्तुत्य उपक्रमाने सकारात्मक चित्र तयार केले आहे. गोंदिया जिल्ह्यात यंदाच्या सारस पक्षी गणनेत नोंद करण्यात आलेल्या 28 सारसांपैकी 26 सारसांची नोंद गोंदिया वनपरिक्षेत्रात आहे. गोंदिया वन प्रशासन, पर्यावरणप्रेमी आणि शेतकरी यांच्या प्रयत्नांतून या पक्ष्यांची संख्या उल्लेखनीयरित्या वाढली आहे. तलावांचा व सारसांचा जिल्हा म्हणून गोंदियाची ओळख आहे. एके काळी जिल्ह्यात सर्वत्र सारस पक्षी आढळायचे. नद्या, तलाव, धान शेती, उथळ पाण्याची ठिकाणं हे सारस पक्ष्याचं आधिवास. रामायणात सारस पक्षांबद्दलचा आदर आणि महत्त्व सांगीतले आहे.
गोंदिया वन विभागात वनपरिक्षेत्राधिकारी म्हणून वर्षभरापुर्वी रुजू झालेले दिलीप कौशिक यांच्या पुढाकारात सेवाभावी संस्था, वनकर्मचारी व शेतकरी सारसांचे संवर्धन करीत आहेत. दुर्मीळ समजल्या जाणार्या सारस पक्ष्यांच्या संख्येत वाढ होत असल्याने गोंदिया वन क्षेत्रात सारसांचे नंदवन फुलत असल्याचं चित्र आहे. सारस पक्षी हे गोंदिया जिल्ह्याचं वैभव असून, या पक्ष्यांचे संवर्धन करून भविष्यात जिल्ह्यात सारस पक्ष्यांचं हब तयार व्हावं यासाठी शासन, प्रशासन, सेवाभावी संस्था व नागरिकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.
ज्या शेतकर्यांच्या शेतात सारसाचे घरटे असेल, त्या शेतकर्याला 10 हजार रुपये प्रोत्साहन मानधन दिले. घरट्यांची संख्या 2 वरून 6 झाली. यात घातलेल्या अंडीतून 12 पिल्ले जन्मास आली. हा विचार या सारस संवर्धन प्रक्रियेला कलाटणी देणारा ठरला. शेतकरी संवर्धन चळवळीचे साथीदार बनले. शेतकर्यांना मानधन दिलं नाही, तर त्यांनी या मोहिमेला हातभार लावल्यामुळं त्यातून खरी सकारात्मक पेरणी झाली. सारसांच्या संवर्धनासाठी शासनातर्फे पाठबळ देण्यास सुरवात झाल्याने या उपक्रमाचे बीज जनमानसात रुजत आहे. – दिलीप कौशिक,, वनपरिक्षेत्राधिकारी, गोंदिया