गौतस्करांनी पोलिस वाहनाला उडविले, २ पोलिस कर्मचारी जखमी
लाखांदूर : गौतस्करी करणा-या पिकअप वाहनांना अडविण्याचा प्रयत्न करणाèया पोलिसांच्या वाहनाचाच पाठलाग करून दुस-या पीकअप ने धडक देवून जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. यात पोलिस वाहनाचे नुकसान होऊन दोन पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची घटना 14 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास दिघोरी/मो. ते लाखांदूर महामार्गावर घडली.
नोंदणी क्रमांक नसलेल्या दोन बोलेरो पिकअप वाहनातून गौतस्करी होत असल्याची माहिती दिघोरी/मोठी पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिस हवालदार उमेश वल्के आणि पोलिस शिपाई अजित शेळके यांनी ठाण्यातून वाहन क्रमांक एमएच 36/एएल 4618 ने लाखांदूर-दिघोरी मार्गावर पोहचले. यावेळी दिसून आलेल्या बोलेरो पिकअप गाडयांना थांबण्याचा इशारा दिला असता त्यांनी आणखी वेगाने पळ काढला. पोलिस वाहनाने पाठलाग सुरू केला असता मागेहून दुस-या बोलेरो पीकअप चालकाने पोलिस गाडीला धडक देवून कर्मचा-यांवर जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न केला. या धडकेत पोलिस वाहनाचे नुकसान झाले असून वाहनातील पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत.
पोलिसांच्या वाहनाला धडक देऊन दोन्ही बोलेरो पीकअप गाडयांमध्ये भरलेल्या मवेशींसह चालक घटनास्थळावरून फरार झाले. या प्रकरणी लाखांदूर पोलिसांनी अज्ञात बोलेरो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.