पुराव्याशिवाय ५० हजारापेक्षा अधिक रक्कम बाळगू नका
गोंदिया : निर्देशानुसार वाहनांमध्ये ५० हजारांपेक्षा अधिक रक्कम आढळल्यास ती जप्तीच्या अधिन असेल त्यामुळे निवडणुकीच्या कालावधीमध्ये प्रवासा दरम्यान पुराव्या शिवाय ५० हजारांपेक्षा अधिक रक्कम जवळ बाळगू नका असे आवाहन करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीतील संभाव्य गैर प्रकारांना आळा घालण्यासाठी गोंदिया जिल्ह्याच्या सिमांवर चेक पोस्ट उभारण्यात आले असून प्रतिदिन ये-जा करणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केल्या जात आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने केंद्रीय निवडणूक आयेगाच्या सुचनांनुसार आणि जिल्हाधिकारी प्रजीत नायर यांच्या निर्देशानुसार जिल्हास्तरावर जप्त रोकड निर्णय समिती गठीत करण्यात आली आहे. निवडणुकीची आदर्शआचारसंहिता लागू झाली असून या आचारसंहितेचे पालन करण्यासाठी प्रशासनाची यंत्रणा डोळ्यात तेल घालून काम करीत आहे. कुठेही आदर्श आचारसंहितेच भंग होणार नाही यासाठी विविध उपाययोजना आखण्यात येत आहेत. निवडणूक आयोगाच्या सुचनांनुसर निवडणुकी दरम्यान स्थिर संनिरीक्षण चमु आणि पोलीस विभागाकडून चेक पोस्टवर वाहनांची तपासणी सुरु करण्यात आली आहे. दरम्यान अत्यावश्यक प्रसंगी ५० हजारांपेक्षा अधिक रोख रक्कम बाळगणे आवश्यक असल्यास त्या संबंधित आवश्यक तो पुरावा सोबत ठेवावा, असे निर्देश देण्यात आले आहे.