स्टॉक असेपर्यंतच १०० रुपयांचे स्टॅम्प पेपर मिळणार

Gondia: १०० व २०० रुपयांच्या मुद्रांकांची विक्री सुरू असली तरी व्यवहार मात्र ५०० रुपयांच्या मुद्रांकांवरच करावे लागत आहेत. शासनाने १४ ऑक्टोबरला महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात सुधारणा करून त्याची अंमलबजावणी सुरू झाल्याने वाढीव मुद्रांक शुल्काचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांना बसू लागला आहे.जुन्या १०० रुपयांचे स्टॅम्प भरपूर पडून असल्याने विक्रेते ५०० रुपयांच्या स्टॅम्पऐवजी १०० रुपयांचे ५ स्टॅम्प देत आहेत. मात्र, त्यावर सह्या करण्यास कंटाळलेले अधिकारी पाचशेचाच एक स्टॅम्प आणा असू सांगून लागले आहेत. यातून सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसू लागली आहे.

सर्वसाधारण व्यवहारासाठी जसे की, प्रतिज्ञापत्र, भाडे करार, विविध कर्ज प्रकरणांसाठी लागणारी प्रतिज्ञापत्रे, शैक्षणिक कामांसाठी लागणारी प्रतिज्ञापत्रे, संचकार पत्र, विक्री करार अशा एक ना अनेक कामांसाठी सरसकट १०० रुपयांच्या मुद्रांकांचा वापर केला जात होता.परंतु त्याच कामांसाठी आता लोकांना जादा ४०० रुपये मोजावे लागत आहेत. हक्क सोडपत्रासाठी आतापर्यंत २०० रुपयांचाच मुद्रांक वापरला जात होता. त्यासाठीही आता ५०० रुपये लागत आहेत.पूर्वी केलेल्या करारपत्राचा आता अंतिम विक्री दस्त करायचा झाल्यास त्यांनाही वाढीव मुद्रांक भरावा लागणार आहे. विविध लोकानुययी योजनांचा कोट्यवधींचा बोजा सरकारच्या तिजोरीवर पडल्याने सरकार उत्पन्नवाढीसाठी असे निर्णय घेत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे.

सर्वसामान्यांच्या खिशाला झळ –
भाडे करार, विविध कर्ज प्रकरणांसाठी लागणारी प्रतिज्ञापत्रे, शैक्षणिक कामांसाठी लागणारी प्रतिज्ञापत्रे, संचकार पत्र, विक्री करार करण्यासाठी अधिकारीवर्गातून आता ५०० रुपयांच्या मुद्रांकांची मागणी केली जाते. १०० चे ५ मुद्रांक आल्यास त्यावर पाचवेळा स्वाक्षरी करावी लागते. त्यामुळे १०० चे मुद्रांक नाकारले जात आहेत.

स्टॉक असेपर्यंतच १०० रुपयांच्या मुद्रांकांची विक्री –
अनेक मुद्रांक विकेत्यांकडे १०० रुपयांचा मुद्रांक स्टॉक मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्यानुसार ५०० रुपयांचा मुद्रांकांची विक्री न करता १०० रुपयांचे ५ असे विक्री केली जात आहे. विक्रेत्याकडे स्टॉक असेपर्यंत १०० रुपयांच्या मुद्रांकांची विक्री केली जात आहे.

Share