गडचिरोलीत पोलीस नक्षलवाद्यांमध्ये चकमक; तीन ते चार नक्षलवादी ठार

गडचिरोली : जिल्ह्यात पोलीस नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. गडचिरोलीतील छत्तीसगड सीमावर्ती भागात नक्षलविरोधी पोलीस पथक आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत तीन ते चार नक्षलवादी ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. एक पोलीस जवान जखमी झाल्याचीही माहिती आहे. भामरागडमधील कोपरीच्या जंगलात ही चकमक झाली आहे. या भागात अनेक नक्षलवादी असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी पोलिसांना दिली होती. त्यानंतर पोलिसांनी या भागात कारवाई केली. या चकमकीत तीन ते चार नक्षलवादी ठार झाल्याची माहिती आहे . गडचिरोलीतील भामरागड तालुक्यातील कोपरी हा शेवटच्या जंगल परिसर आहे. या भागात सध्या चकमक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या कोपरीच्या जंगलात मोठ्या प्रमाणात नक्षलवादी असल्याचा गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर या जंगलात ऑपरेशन राबविण्यात आलं आहे. C-60 पोलीस पथकाचे तुकड्या वाढवण्यात आल्या आहेत.

धर्मराव बाबा आत्राम यांच्या सुरक्षेत वाढ

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते, राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम आज गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. धर्माराव आत्राम आज भामरागड दौऱ्यावर आहेत. अशातच भामरागड तालुक्यात चकमक घडल्यामुळे आत्राम यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. आत्राम यांच्या सुरक्षेसाठी वाहनांच्या ताफा येण्यास सुरुवात झालीय. आत्राम यांना पोलिसांच्या मोठा बंदोबस्त देण्यात येणार असल्याची माहिती आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी कॅबिनेट मंत्री आत्राम हे भामरागड तालुक्याला सकाळी गेले. त्यानंतर ते आता गडचिरोलीत विविध ठिकाणी प्रचारासाठी फिरणार आहेत. अशातच पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. त्यामुळे आत्राम यांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे.

Share