५ हजाराची लाच भोवली , वनरक्षकासह वनमजूर ‘एसीबी’च्या जाळ्यात
गोंदिया ◼️तक्रारदार यांची सडक अर्जुनी तालुक्यातील दल्ली येथे वन जमीनीला लागून शेती आहे. दोन आठवड्यापुर्वी तक्रारदार यांनी शेतालगतच्या वन जमिनीतील झाडे-झुडपे तोडून शेती करण्याकरीता जमिनीची मशागत केली होती. दरम्यान, १३ सप्टेंबरला वनरक्षक चव्हाण याने तक्रारदार यांना फोन करून वन विभागाच्या कार्यालयात बोलावून घेत त्यांना शासकीय वन जमिनीवरील झाडे झुडपी तोडून अतिक्रमण केल्याबाबत नोटीस दिली व शासकीय वन जमिनीवरील झाडे-झुडपे तोडल्याबाबत कारवाई न करण्याकरिता २० हजाराच्या लाचेची मागणी केली. मात्र, तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया येथे तक्रार दिली होती. त्यानंतर पडताळणी दरम्यान आरोपी वनरक्षक याने पंचासमक्ष २० हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती १० हजार रुपये लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवली. दरम्यान, आरोपी वनरक्षक याच्या सांगण्यावरून आरोपी वनमजूर याने लाच रकमेतील पहिला हप्ता ५ हजार रुपये तक्रारदाराकडून स्वीकारला. यावेळी पथकाने दोन्ही संशयितांना रकमेसह रंगेहाथ ताब्यात घेतले. या प्रकरणी वनरक्षक व वनमजूर यांच्याविरूद्ध डुग्गीपार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.