जिल्ह्यातील 65 ग्रामपंचायतीमधुन क्षयरोग हद्दपार

गोंदिया– राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमात वर्ष 2023 काळातील जिल्हा परिषदेचे आरोग्य विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात टीबी मुक्त गाव या संकल्पनेतून टीबी मुक्त ग्रामपंचायत अभियान राबविण्यात आले. यात 65 ग्रामपंचायतीने क्षयरोग मुक्त होण्याचा मान मिळवला आहे.या सर्व ग्रामपंचायतींना गौरवण्यात येणार असल्याची माहीती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार यांनी दिली आहे.या उपक्रमामध्ये प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात क्षय रुग्णांचा शोध घेण्यात येत आहे. तसेच जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.यासाठी गोंदिया जिल्ह्यात क्षयरोग केंद्रातील डॉ.वेदप्रकाश चौरागडे, डॉ.देव चांदेवार यांचेसह या अभियानासंबधी पर्यवेक्षण करित आहे.या उपक्रमामध्ये टीबीमुक्त ग्रामपंचायतीसाठी क्षयरोगाचे निकष पूर्ण केल्यास ग्रामपंचायत स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतात.या उपक्रमात हजार लोकसंख्येमध्ये कमीत कमी टीबी संशयित क्षयरुग्ण शोधून त्यांची थुंकी नमुन्याची तपासणी करावयाची आहे.त्या मध्ये एक किंवा कमी निरंक रुग्ण आढळल्यास ग्रामपंचायत पात्र ठरणार आहे.
या ग्रामपंचायतीचे वेरिफिकेशन सुरू असून स्पर्धेत पात्र ठरलेल्या ग्रामपंचायतींना पहिल्या वर्षी टीबी मुक्त असल्यास कांस्यपदक दुसऱ्या वर्षी टीबीमुक्त असल्यास रजत आणि तिसऱ्या वर्षी टीबी मुक्त राहिल्यास सुवर्णपदक देण्यात येवुन गौरविण्यात येणार असल्याची माहीती जिल्हा क्षयरोग प्रशासनाने दिली आहे.
टीबी मुक्त गाव अभियानातील उपक्रम आरोग्य विभागाने काटेकोरपणे राबविल्याने ग्रामपंचायती टीबी मुक्त झाल्या आहेत.यात गावपातळी वरची आशा सेविकापासुन उपकेंद्र स्तरावरील समुदाय आरोग्य अधिकारी,आरोग्य सेवक,आरोग्य सेविका तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, आशा गट प्रवर्तक व सर्वच क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी योगदान दिले असल्याचे डॉ.गोल्हार यांनी सांगितले.चालू वर्षात मोठ्या संख्येने ग्रामपंचायती अभियानात सहभागी होऊन क्षयरोगमुक्त होण्यासाठी पुढे यावे व क्षयरोग उच्चाटनासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे यांनी म्हटले आहे. आरोग्य विभागाने क्षयरोग उपचारासाठी आवश्यक प्रचार प्रसिद्धी तसेच लोकसहभागातून निक्षयमित्र योजनेतुन गोरगरीब क्षयरोग रुग्णांसाठी फूड बास्केट उपलब्ध करुन मोठ्या प्रमाणात काम करण्याच्या सुचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम यांनी आरोग्य प्रशासनाला दिल्या आहेत.
क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत पुरस्काराची वैशिष्ट्ये
1) हजारामध्ये एकापेक्षा कमी रुग्ण.
2) हजारामध्ये 30 पेक्षा अधिक संशयित रुग्णांची तपासणी
3) रुग्ण बरे होण्याचे 85% होऊन अधिक प्रमाण
4) ड्रग सेंसिटिव्हिटी 85% पेक्षा जास्त चाचणी
5) रुग्णांसाठी उपचारासह पोषण कीट व अन्य सुविधांची 100% उपलब्धता
6) पहिल्या वर्षी कास्य , दुसऱ्या वर्षी सिल्वर व तिसऱ्या वर्षी सुवर्णपदक पुरस्कार.
क्षयरोग दूर करण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये स्पर्धा निर्माण करणे आणि त्यांच्या योगदानाचे सार्वजनिक रित्या गौरव करणे असे या उपक्रमाचे उद्देश असल्याचे डॉ. गोल्हार यांनी सांगितले.गोंदिया जिल्ह्यात वर्ष 2023 साठी 65 ग्रामपंचायती पात्र होवुन निवड झाल्या आहेत. सर्व निकष पात्र ग्रामपंचायतींचा जिल्हाधिकारी प्रशासनामार्फत गौरविण्यात येणार आहे.त्यात गोंदिया तालुक्यातील 14, सडक अर्जुनी तालुक्यातील 11, मोरगाव अर्जुनी तालुक्यातील 10,तिरोडा तालुक्यातील 09, आमगाव तालुक्यातील 08, गोरेगाव तालुक्यातील 05, सालेकसा व देवरी तालुक्यातील प्रत्येकी 4 ग्रामपंचायतीचा समावेश आहे.

Share