सौंदडवासी राजमार्ग प्राधिकरण विभागीय कार्यालयाला ठोकणार कुलूप!

सौंदड उड्डाणपूल बांधकाम व सर्व्हिस मार्ग दुरुस्तीची मागणी

सौंदड◾️ राष्ट्रीय महामार्ग सौंदड येथील रेल्वे उड्डाण पुलाचे बांधकाम व सर्व्हिस मार्ग तातडीने दुरुस्त करावे, अन्यथा दिरंगाईच्या विरोधात भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या नागपूर विभागीय कार्यालयाला 16 ऑगस्ट रोजी कुलूप ठोकून निदर्शने करण्याचा इशारा सौंदडचे सरपंच हर्ष मोदी यांनी 29 जुलै रोजी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना पाठविल्या पत्रातून दिला आहे. पत्रानुसार, सौंदड रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम कंत्राट राजदीप बिल्डकॉम कंपनीला आहे. गत पाच वर्षांपासून कासव गतीने काम सुरू आहे. सध्या बांधकाम अर्धवट सोडून बंद आहे. सर्व्हिस मार्गाचा वाहतुकीसाठी वापर होत आहे. सर्व्हिस मार्गाची अत्यंत दयनीय स्थिती झाली आहे. याबाबत सौंदड ग्रामपंचायतने अनेकदा कंत्राटदाराला पत्र देऊन सर्व्हिस मार्ग दुरूस्त करण्याची मागणी केली. मागणीकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांनी गतवर्षी 29 डिसेंबर रोजी ‘ठेकेदार हटाओ रोड बनाओ-भिक मांगो आंदोलन केले. दरम्यान रस्ता दुरूस्तीची करण्याची ग्वाही दिली. यानंतरही स्थिती ‘जैसे थे’ आहे. विद्यार्थी सर्व्हिस मार्गावरील बसथांब्यावरुनच बस पकडून प्रवास करतात. सर्व्हिस मार्गावर रोज वाहतुकीची कोंडी होते. परिणामी विद्यार्थी वेळेवर शाळेत पोहोचू शकत नाही. त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. कंत्राटदाराने स्थानिक व्यापार्‍यांकडून विविध वस्तुंची खरेदी केली. परंतु सहा महिन्यापासून त्यांची रक्कम अदा केली नाही. या प्रकल्पावर कार्यरत कर्मचार्‍यांचे मासिक वेतन सहा महिन्यापासून कंत्राटदाराकडे रखडून आहे. पुलाचे बांधकाम व सर्व्हिस रोडची तत्काळ दुरुस्ती करावी. अन्यथा दिरंगाईच्या विरोधात राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या नागपूर विभागीय कार्यालयाला कुलूप ठोकून निदर्शने करण्याचा इशाराही पत्रात नमूद केला आहे. पत्राची प्रत खासदार, आमदारांसह प्राधिकरणाच्या प्रकल्प संचालकांना पाठविण्यात आली आहे.

Share