गोंदिया जिल्हात अतिवृष्टी, दोघांचा रेसक्यू तर एकाचा मृत्यू

देवरी: रुसून बसलेल्या पावसाने अखेर जिल्हावासीयांवर मेहरबानी केली. शुक्रवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेला पाऊस सकाळी नऊपर्यंत बरसला. पावसासाठी आसुसलेला शेतकरी सुखावला आहे. आता धान रोवणीच्या कामाला वेग येणार आहे.

जिल्ह्यात शुक्रवारी मध्यरात्रीपासून सर्वत्र पावसाने जोरदार हजेरी लावली. तळ गाठलेल्या नदी, नाले, तलावातील पाणी साठ्यात वाढ होत आहे. सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला धरणाचे 11 दरवाजे 0.30 मीटरने उघडण्यात आले असून 8323 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदी, नाले व सखल भागातील नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शहरात काही ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. या पावसाने नगर परिषद प्रशासनाची मात्र पोल खोल केली. मध्यरात्रीपासून सुरू झालेला पाऊस सकाळी 9 वाजेपर्यंत सुरू होता. यानंतर विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा दुपारी दीडच्या सुमारास हजेरी लावली. चार तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे येथील जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र होते.

सडक अर्जुनी तालुक्यातील चुलबंद नदीला पूर आल्याने पिपरी येथील शेतकरी रवींद्र पुंडे आणि त्यांचा मुलगा अजय पुंडे हे बापलेक पुराच्या वेढ्यात अडकले. त्यांनी झाडाला आश्रय घेत फोनवरून गावकर्‍यांना माहिती दिली. यानंतर बचाव पथकाच्या मदतीने दोघांनाही पुरातून सुखरुप बाहेर काढले. खडकी येथील निमराज शिवणकर, रामू पंधराम यांनाही पुराच्या वेढ्यातून बाहेर काढले. सकाळी शेतात गेलेले दोन तरुण शेतकरी दल्ली नाल्याच्या पुरात अडकले होते. त्यांना बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढले आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील विहिरगाव बर्ड्या येथील यशवंत पांडुरंग कोसरे व त्याची पत्नी आशा कोसरे हे सकाळी 10 वाजता गावाजवळील येरंडीदेवी येथील स्वत:च्या शेतात गेले होते. मात्र शुक्रवारी मध्यरात्रीपासून झालेल्या पावसाने शेतात पाणी साचले होते. त्यातच सकाळी जोरदार पाऊस झाल्याने शेताला तलावाचे स्वरुप प्राप्त झाले व या पाण्यात दोघेही अडकले.याची माहिती मिळताच बचाव पथकाने स्थानिक ढिवर बांधवांच्या सहकार्याने त्यांना बाहेर काढले. तिरोडा येथील मुख्य बसस्थानकात पावसाचे पाणी साचल्याने प्रवाश्यांची तारांबळ उडाली. जिल्ह्यात आज यंदाच्या मोसमातील विक्रमी 83 मिमी पावसाची नोंद झाली. गोंदिया, गोरेगाव, आमगाव तालुका वगळता तिरोडा, सालेकसा, देवरी, सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव तालुक्यात अतिवृष्टी झाली. आज जिल्ह्यात सरासरी 83 मिमी पावसाची नोंद झाली. मागील वर्षी याच कालावधीत 503 मिमी पाऊस बरसला होता. यंदा 1 ते 20 जुलै या कालावधीत 412.2 मिमी पावसाची नोंद आहे. आतापर्यंत सरासरी 89.5 टक्के पाऊस कोसळला.

तालुकानिहाय पाऊस…

गोंदिया तालुक्यात 35.5 मिमी पाऊस नोंदला गेला. आमगाव 60.1 मिमी, तिरोडा 73.2 मिमी, गोरेगाव 63.9 मिमी, सालेकसा 78.2 मिमी, अर्जुनी मोर तालुक्यात सर्वाधिक 153.6 मिमी पाऊस झाला. देवरी 123.5 मिमी, सडक अर्जुनी तालुक्यात 79.4 मिमी पाऊस नोंदला गेला. 

नाल्यात बुडून इसमाचा मृत्यू

देवरी तालुक्यातील पिंडकेपार गोटाबोडी नाल्याच्या पुरात बुडून इसमाचा मृत्यू झाला. विजय नाईक (38, रा.पिंडकेपार) असे मृतकाचे नाव आहे. तो गावाशेजारील पिंडकेपार गोटाबोडी नाल्यावर मासे पकडण्यासाठी गेला होता. दरम्यान तोल जाऊन तो पाण्यात पडला व बुडून मृत्यू झाला. दरम्यान बचाव पथकाने त्याचा मृतदेह बाहेर काढला. देवरी पोलिसांनी घटनेचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.

Share