जिल्हातील ३९८ अंगणवाड्या पाण्याविना तर २१६ अंगणवाड्या शौचालयाविना

◼️चिमुकल्यांची अंगणवाडी पाण्याविना

गोंदिया : बालमनापासून साक्षरतेचे धडे मिळावे, यासाठी शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने अंगणवाडी केंद्र सुरू करण्यात आले. याअंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून चिमुकल्यांना शिक्षणासह सकष आहारासह अनेक उपक्रम राबविले जातात. मात्र जिल्ह्यातील १७२४ अंगणवाडीपैकी ३९८ अंगणवाडी केंद्रात अद्यापही पाण्याची सोय नसल्याचे समोर आले आहे. यामुळे चिमुकले तहान भागविण्यासाठी इतर धाव घेत असून सुविधांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे पालक बोलू लागले आहेत. बालकांच्या सर्वांगिण विकास आणि शिक्षणाचे धडे मिळावे, यासाठी महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने अंगणवाडी केंद्र सुरू करण्यात आले. गोंदिया जिल्ह्यात शहरी ते ग्रामीण अशा एकूण १७२४ अंगणवाडी केंद्र संचालित आहेत. या केंद्राच्या माध्यमातून स्तनदा-गरोदर मातांसह लहान मुले व किशोरवयीन मुलींना पोषण आहाराचे वाटप करण्यात येते. आजघडीला जिल्ह्यात १७२४ अंगणवाडी केंद्र मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी काही अंगणवाड्या एकाच इमारतीत असून, काही अंगणवाड्यांची स्वतःची इमारत नसल्याने भाड्याच्या खोलीत सुरू आहेत. त्यातच सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याच्या बोंबा मारण्यात येतात. परंतु, प्रत्यक्षात शासनाचेच सुविधा उपलब्ध करवून देण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील ३९८ अंगणवाडी केंद्रामध्ये पाण्याची सोय नसल्याने चिमुकल्यांना इतर धाव घ्यावी लागत आहे. या गंभीर प्रकाराकडे शासन व जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने लक्ष केंद्रीत करून सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी पालकांकडून केली जात आहे.

२१६ अंगणवाड्या शौचालयाविनाच

जिल्ह्यात १७२४ अंगणवाडी केंद्र मंजूर आहेत. या केंद्रामध्ये सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. परंतु, अनेक केंद्र समस्यांनी ग्रस्त आहेत. त्यातही शौचालयाची व्यवस्था असणे गरजेचे असूनही दुर्लक्ष केले जात आहे. एकीकडे शासन स्वच्छतेवर भर देत असताना काही गावांतील २१६ अंगणवाड्यांमध्ये शौचालयांची निर्मितीच करण्यात आली नाही. तर अनेक केंद्रातील शौचालय उपयोगात येण्याच्या अवस्थेत नसल्याचेही समोर आले आहे.

Share