जिल्ह्यात गंभीर क्षयरोग रुग्णांच्या उपचारावरील औषधांचा तुटवडा
प्रहार टाईम्स नेटवर्क| भुपेन्द्र मस्के
गोंदिया:केंद्र सरकारकडून क्षयरोग रुग्णांवर नियंत्रण मिळविण्यासाठी राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येतो. या कार्यक्रमांतर्गत केंद्र आणि राज्य सरकारकडून मोफत उपचार देण्यात येतात. त्यासाठी औषधांचा पुरवठादेखील केला जातो. मात्र औषधांच्या पुरवठ्यालाचा ‘क्षय’ रोग झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. गंभीर क्षय रोग रुग्णांना (एमडीआर, मल्टी ड्रग रेझिस्टंट ) उपचारासाठी आवश्यक असलेल्या औषधांचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे गंभीर रुग्णांचे उपचार आता रामभरोसेच असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
वेळीच औषधांचा पुरवठा झाला नाही तर राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
खुल्या मार्केटमध्ये अपेक्षित असलेली औषधे उपलब्ध नाहीत. तसेच नव्याने औषधे येण्यासाठी दोन ते तीन आठवड्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे गंभीर रुग्णांना औषधे मिळणार का, असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. तसेच त्यामुळे क्षयरोग निर्मूलनाच्या घोषणेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत औषधांची मागणी वरिष्ठ अधिकारी यांना करण्यात आली. पण राज्य शासनाकडे क्षयरोगाची औषधे नसल्यामुळे औषध पुरवठा होऊ शकला नाही.
- डॉ. ललित कुकडे, तालुका वैद्यकीय अधिकारी, देवरी जिल्हा गोंदिया.