देवरी🚨संस्थेच्या वादात शिक्षकाने केली संस्था उपाध्यक्षाची हत्या
🔺तालुक्यातील सिद्धार्थ विद्यालय डवकी येथील हृदयदावक घटना
देवरी◼️ तालुक्यातील सिद्धार्थ विद्यालय तथा महाविद्यालय डवकी येथे संस्थापक आणि एका शिक्षकांचा वाद झाल्यानंतर मध्यस्थी करायला गेलेल्या संस्था उपाध्यक्ष यांना आपला जीव गमवावा लागल्याची गंभीर घटना आज ता.१६ रोजी सकाळी उघडकीस येताच परिसरात खडबड उडाली आहे. हत्या झालेल्या सेवानिवृत्त लिपिक/ उपाध्यक्षाचे नाव मुकुंद बागडे रा.मुल्ला वय ६० वर्ष असे आहे.
प्राप्त माहितीनुसार सविस्तर असे की, सिद्धार्थ विद्यालय तथा महाविद्यालय डवकी येथे शाळेच्या संस्थेची सभा ता.१५ रोजी आयोजित करण्यात आली होती. संस्थेची सभा संपली आणि सदर शाळेतील शिक्षक आरोपी हिरालाल खोब्रागडे (वय ५२) यांनी अचानक येऊन संस्था अध्यक्ष तथा शाळेचे प्राचार्य महेंद्र मेश्राम यांच्यात शाब्दिक बाचाबाची सुरू केला. यामध्ये अचानक आरोपीने माझे आयुष्य बरबाद केले म्हणून मुख्याध्यापकावर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये मृतक मुकुंद बागडे वाद मिटविण्याचा दृष्टिकोनातून मध्यस्थी करिता गेले असता, खोब्रागडे यांनी रागाच्या भरात मुख्याध्यापकांना सोडून मृतकाना मारहाण केली त्यात डोक्याला जबर मार बसला परिणामी मृतक जागीच बेहोश झाल्यानंतर त्याला प्राथमिक उपचारासाठी देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.परिस्थिती गंभीर असल्यामुळे गोंदिया येथील एका खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले परंतु आज ता.१६ रोजी पहाटे ३ दरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. देवरी पोलीस स्टेशनमध्ये आरोपी विरुद्ध भांदवी कलम ३०२ अंतर्गत नोंद केला असून आरोपीला अटक करण्यात आली. पुढील तपास देवरी पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे करीत आहे.