त्या लाचखोरांची पोलिस कोठडीत रवानगी

गोंदिया: बांधकामाच्या कार्यादेशासाठी कंत्राटदराकडून 1,82,000 हजार रुपयाची लाच स्विकारणार्‍या मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, बांधकाम सभापती, नगरसेविकेचे पती व खाजगी इसम अशा 6 जणांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवार 14 मे रोजी कारवाई केली होती. या सहाही आरोपींची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

सडक अर्जुनी नगरपंचायत क्षेत्रात वैशिष्टपूर्ण कामाअंतर्गत नाली बांधकामाचे कंत्राट तक्रारदाराला मिळाले होते. या बांधकामाच्या कार्यादेशासाठी नगराध्यक्ष तेजराम मडावी, मुख्याधिकारी तथा नायब तहसीलदार शरद हलमारे, बांधकाम सभापती अशलेश अंबादे, नगरसेवक महेंद्र वंजारी, नगरसेविकाचा पती जुबेर शेख आणि खाजगी इसम शुभम येरणे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापडा कारवाई करून बुधवारी 1 लाख 82 हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहात पकडले होते. सर्व आरोपींवर डुग्गीपार पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करून ताब्यात घेण्यात आले होते. सर्व आरोपींना जिल्हा न्यायालयात सादर करण्यात आले. न्यायालयाने 16 मेपर्यंत त्यांना पोलिस कोठडी ठोठावली आहे.

Share