गोंदिया-खेडेपार बस फेरी पुर्ववत करा: सविता पुराम

गोंदिया : गोंदिया-खेडेपार बस फेरी बंद करण्यात आल्याने परिसरातील विद्यार्थी व प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. गोंदिया-खेडेपार बस पूर्ववत सुरू करून परिसरातील विद्यार्थी व प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी जिपच्या महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम यांनी जिल्हाधिकारी, एसटी विभागाचे आगार व्यवस्थापक यांना 14 मे रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

आमगाव मार्गे कावराबांध कोटजभुरा, पवारीटोला, नवेगाव, बाम्हणी, खेडेपार येथे दिवसातून एसटीच्या दोन फेर्‍या सुरू होत्या. त्यामुळे गाव परिसरातील विद्यार्थी, कामगार, मजूर, शेतकरी, छोटे व्यवसायिक यांना आमगाव व गोंदिया येथे शिक्षण व इतर कामानिमित्त जाण्याकरिता सोयीचे होते. परंतु काही महिन्यांपूर्वी गोंदिया-खेडेपार बस फेरी बंद करण्यात आली. त्यामुळे परिसरातील प्रवाशांसह विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. या मार्गावर इतर दळणवळणाची साधने नाहीत. शेतकरी, मजुरांचे आर्थिक व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याकरिता गोंदिया-खेडेपार एसटीची सेवा पूर्ववत करावी, अशी मागणी सविता पुराम यांनी जिल्हाधिकारी व आगार व्यवस्थापकांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

Share