वाळूच्या वाहनावर कारवाई न करण्यासाठी मागितली लाच, तहसीलदारासह २ आरोपी एसीबीच्या जाळ्यात!

◼️तहसीलदार व नायब तहसीलदार यांनी एक लाख रुपयात विकली आपली इमानदारी!

◼️पकडलेल्या दोन ब्रास वाळूच्या ट्रकला ट्रॅक्टर दाखवून लाचेची केली मागणी गोंदिया जिल्ह्यातील महसूल विभागाचा अजब गजब कारनामा

गोंदिया: अवैध रेती वाहतुकीचा कारभार संपूर्ण गोंदिया जिल्ह्यामध्ये पसरला असून रेतीची अवैध रित्या वाहतूक करण्याची परवानगी देण्यासाठी म्हणजेच चोरीच्या वाहनावर कारवाई न करण्यासाठी लाचखोर तहसीलदाराने लाचेची मागणी केली होती. तहसीलदार भदाणे यांनी एक लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी तीन आरोपींवर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया यांनी कारवाई केली. तहसीलदार भदाणे यांच्यावर १० लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी देखील एक तक्रार आहे.

वाळू माफिया आणि अधिकाऱ्यांमध्ये असलेले संगणमत पुन्हा एकदा समोर आल्याने संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. रेती माफिया आणि महसूल विभागात संबंध असल्याची चर्चा तर आहेच परंतु झालेल्या कारवाईवरून हे सिद्ध सुद्धा झालेले आहे की महसूल विभाग कशाप्रकारे आपले खिसे गरम करते.

०७ मे रोजी झालेल्या कारवाईत आरोपी लोकसेवक १) किसन कचरू भदाणे वय ५० वर्ष तहसीलदार तहसील कार्यालय गोरेगाव, २) ज्ञानेश्वर रघुजी नागपुरे वय ५६ वर्ष नायब तहसीलदार तहसील कार्यालय गोरेगाव, ३) खाजगी ईसम राजेंद्र गोपीचंद गणवीर वय ५२ वर्ष संगणक आॅपरेटर, तहसील कार्यालय गोरेगाव. यांच्या विरोधात गोंदिया लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे दि. ११ मार्च रोजी तक्रार प्राप्त झाली होती. त्या आधारावर पडताळणी दि. ११,१२,१३, व १४ मार्च रोजी करण्यात आली.

प्रकरणात १ लाख रुपयांची लाच मागणी तहसील कार्यालय गोरेगाव येथे करण्यात आल्याचे सिद्ध झाल्याने जिल्हा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने तिन्ही आरोपींना दि. ०७ मे रोजी रात्री ताब्यात घेऊन पुढील कारवाई केली.

तक्रारदार व त्यांचा मित्र यांचा बिल्डिंग मटेरिअल सप्लाय करण्याचा व्यवसाय असून त्यांच्या मालकीचे सहा चाकी प्रत्येकी एक टिप्पर आहेत. दि. ०४/०३/२०२४ रोजी दुपारी ०१ वा चे सुमारास दोन्ही टिप्पर मधुन प्रत्येकी २ ब्रास वाळू वाहतूक करताना मौजा गिधाडी शिवारात मंडळ अधिकारी व पथकाने दोन्ही टिप्पर पकडून तहसील कार्यालय गोरेगाव येथे जमा केले.

आरोपी क्रं १ याने तक्रारदार व त्यांचा मित्र यांना एक ब्रासचे चालान भरण्यास सांगीतल्या वरून दि. ०६/३/२०२४ रोजी तक्रारदार व त्यांचा मित्र यांनी प्रती वाहन प्रमाणे १,२३,८८३/- रुपयाचे चालान बॅंकेत भरले व त्याच्या पावत्या घेऊन तहसील कार्यालय गोरेगाव येथे गेले असता त्यांना टिप्परच्या चाव्या न मिळाल्याने ते त्यांच्या गावी निघून गेले.

गावातील त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीने तक्रारदार यांना गावात भेटुन सांगितले की तुमचे टिप्पर सोडण्यासाठी व या पुढे वाळूची वाहतूक सुरू ठेवण्यासाठी प्रती वाहन ५० हजार या प्रमाणे दोन्ही वाहनांचे रू १ लाख रुपये हे किसन भदाणे तहसीलदार गोरेगाव यांना द्यावे लागतील असा निरोप दिला. लाच मागणी पडताळणी दरम्यान तक्रारदार व त्यांचा मित्र यांनी दंडाच्या रकमेचे चालान भरलेले असताना देखील आरोपी किसन भदाणे तहसीलदार गोरेगाव याने जप्त वाहने सोडण्याकरीता ‘आणखी एक चालान भरा ‘अशी कार्यालयीन कामकाजाची भाषा द्विअर्थी वापरून जप्त दोन्ही वाहने सोडण्यासाठी १ लाख रुपयाये लाचेची मागणी करुन लाच स्विकारण्याची तयारी दर्शविली.

सापळा कारवाई दरम्यान आरोपी किसन भदाणे तहसीलदार गोरेगाव याने लाचेची रक्कम खाजगी ईसमाकडे (आरोपी क्रं 3) देण्यास सुचीत केले. खाजगी ईसमाने फिर्यादी सोबत असलेल्या पंचाकडे चौकशी केली असता त्यास पंचाबाबत संशय आल्याने लाच स्विकारली नाही.

तक्रारदार व त्यांचा मित्र यांच्या टिप्पर मध्ये प्रत्येकी २ ब्रास वाळू असताना व प्रत्येकी 2 ब्रास वाळू सह वाहने जप्त केल्याबाबतचे पंचनामे मंडळ अधिकारी व पथकाने आरोपी किसन भदाणे तहसीलदार गोरेगाव यांना सादर केले. असता आरोपी क्रं : 1,2 व 3 यांनी संगनमताने जप्त केलेली वाहने ही २ ब्रास रेती असलेले टिप्पर नसुन त्यामध्ये एक ब्रास रेती होती असे दाखवण्याकरीता इंडेमनेटी बाॅंड तयार करताना सदरचे वाहन हे ट्रॅक्टर असल्याचे नमूद करून बनावट कागदपत्रे तहसील कार्यालयात तयार केले. तसेच आरोपी क्रं : 2 याने तक्रार दारास इंडेमनेटी बाॉंड तयार करून देण्यास मदत केल्याच्या मोबदल्यात पार्टी देण्याची मागणी केली.

सर्व आरोपी व खाजगी ईसमांस ताब्यात घेण्यात आले असून यांच्या विरूद्ध गोरेगाव पो. स्टे. येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यातील आरोपी किसन भदाणे तहसीलदार गोरेगाव यास यापूर्वी ठाणे येथे तहसीलदार म्हणून कार्यरत असताना १० लाख रुपये लाच स्वीकारल्या बाबत सन २०१७ मध्ये ठाणे नगर पोलीस स्टेशन ठाणे शहर येथे गुन्हा दाखल आहे.

सदर ची सापळा कार्यवाही विलास काळे, पोलीस उप अधीक्षक, पो.नी. अतुल तवाड़े, पो.नि. उमाकांत उगले, स.फौ. चंद्रकांत करपे, पो.हवा. संजयकुमार बोहरे, मंगेश काहालकर, ना.पो.शि. संतोष शेंडे, संतोष बोपचे, अशोक कापसे, नापोशि प्रशांत सोनवाने, मनापोशी संगीता पटले ,चालक ना.पो.शि. दिपक बाटबर्वे यांच्या पथकाने कारवाई केली.

Share