शिक्षण विभागाचा ‘तो’ ब्लॉग सर्वसामान्यांसाठी बंद !
गोंदिया◼️ जिल्ह्यातील शैक्षणिक समस्या, योजना, उपक्रमांची माहिती जनतेला व्हावी या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या समग्र शिक्षा विभागाने ब्लॉग तयार केला होता. या ब्लॉगवर जुनीच माहिती नमूद होती. माध्यमांचे वृत्त झळकताच समग्र शिक्षा विभागाने हा ब्लॉगच सर्वसामान्यांसाठी बंद केला.
आज तंत्रज्ञानाचे सर्वच क्षेत्रांत आमुलाग्र क्रांती केली आहे. शासकीय, निमशासकीय, खाजगी कार्यालये डिजिटलायझेशन केले जात आहे. संबंधित कार्यालयांची आवश्यक माहिती, उपक्रम, योजना जनतेला माहीत व्हाव्यात म्हणून कार्यालयांच्या साईटवर संबंधित माहिती टाकली जाते. परंतु गोंदिया जिल्हा परिषदेच्या समग्र शिक्षण विभागाने माहिती तर ब्लॉगवर टाकली. मात्र वेळोवेळी माहितीचे अद्ययावतीकरण करण्याचा विसर पडला. ब्लॉगवर मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अनिल पाटील तर प्राथमिकचे शिक्षणाधिकारी म्हणून महेंद्र गजभिये कार्यरत असल्याचे फोटोसह नमूद होते.
ब्लॉगच्या मुख्य पानावर होम, अबाऊट डिस्ट्रिक, पीएसएम, एसएसए, यु-डायस, एसडीएमआयएस, सरल, ट्रान्सफर, वेबसाईट, कॉन्टॅक्ट अस, फोटो गॅलरी आदी पर्यायात जुनीच माहिती नमूद असल्याचे ब्लॉगला भेट दिल्यावर निदर्शनास आले. मुख्य पानाच्या उजव्या बाजूला की पर्सन पर्यायामध्ये तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील व शिक्षणाधिकारी महेंद्र गजभिये यांचा फोटो होता. दोन महिन्यापूर्वी अनिल पाटील यांचे स्थानांतरानंतर मुरुगांथम एम. तर गजभिये यांच्या जागी जी. एन. महामुनी यांनी पदभार स्वीकारला.
यानंतर ही माहिती अद्ययावत होणे आवश्यक होते. आज ब्लॉगला आज भेट दिली असता हा ब्लॉग फक्त निमंत्रितांसाठी खुला आहे, असा संदेश निदर्शनास आला. या ब्लॉगवर सर्व प्रकारच्या समस्यांचा शोध घेवून त्यावर उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला जाणार, असे नमूद देखील होते. समस्या शोधून त्यावर तोडगा वा उपाययोजना झाल्यात की नाही ते माहित नाही. मात्र सर्वसामान्यांसाठी हा ब्लॉगच सगग्र शिक्षण विभागाने बंद केला.