उन्हाळी धानाचे जमिनीवर लोटांगण !

गोंदिया◼️ हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार शहरासह जिल्ह्याला आज 7 मे रोजी वादळी पावसाने झोडपून काढले. उष्णतेपासून जिल्हावासीयांना दिलासा मिळाला असला तरी या पावसाचा कापणीस आलेल्या उन्हाळी धान पिकाला चांगलाच फटका बसल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  मागील काही दिवसांपासून अवकाळी पाऊस जिल्ह्याला झोडपून काढत आहे. दोन दिवसांपासून जिल्ह्याचे तापमान 41 अंशापेक्षा अधिक नोंदले जात आहे. अशातच प्रादेशिक हवामान विभागाने जिल्ह्यात मेघ गर्जना, विजांचा कडकडाट, गारांससह वादळी पावसाचा इशारा दिला होता.

सोमवारी रात्री ढगाळ वातावरण होते. आज पहाटे 5 वाजताच्या सुमारास शहरासह जिल्ह्यातील काही भागात वार्यासह रिमझीम पावसाने हजेरी लावली. यानंतर दिवसभर उन्ह-सावलीचा खेळ सुरू होता. संध्याकाळी 4.30 वाजेच्या दरम्यान आकाशात काळे ढग दाटून आले. 5 च्या सुमारास विजांचा कडकडाट, मेघगर्जना, वादळासह पावसाला सुरावात झाली. काही भागात वादळामुळे झाडे उलमडून पडली. अनेक भागात वीज पुरवठा खंडीत झाला. रात्री उशिरापर्यंत अनेक अंधारात होता. वादळाच्या तडाख्याने उन्हाळी धानाने अक्षरशः जमिनीवर लोटांगण घातले. कैर्‍यांचा जमिनीवर सडा पडला. 

फळबागा, पळसबागा यांनाही वादळी पावसाचा फटका बसला. या पावसामुळे 41.6 अंशावर गेलेला पारा 37 अंशावर आला. पाऊस ओसरल्यावर वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाल्याने उष्णतेपासून त्रस्त झालेल्या जिल्हावासीयांना दिलासा मिळाला. जिल्ह्यात पुढील पाच दिवस काही ठिकाणी मेघ गर्जना, विजांचा कडकडाट, गारांससह वादळी पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान खात्याने वर्तविला आहे.

Share