रेल्वे उड्डाण पुलाच्या बांधकामाला मुहूर्त सापडेना

गोंदिया: शहरातील जुना रेल्वे उड्डाणपूल मुदतबाह्य झाल्याने दोन वर्षापूर्वीच जमिनदोस्त करण्यात आला. यानंतर नविन पुलाच्या बांधकामाला प्रारंभ होणे अपेक्षित होते. मात्र शासकीय दिरंगाईत काम रखडले. अखेर 6 जानेवारी रोजी पूल बांधकामाचे भूमिपूजन आ. विनोद अग्रवाल, माजी आ. राजेंद्र जैन यांच्या हस्ते पार पडले. भूमिपूजनाला चार महिने लोटले असताना कंत्राटदार कंपनीला बांधकामाचा मुहूर्त सापडला नसल्याने जनतेत संताप आहे. दरम्यान, आज आ. विनोद अग्रवाल यांनी प्रत्येक्ष मौकास्थळी जाऊन पाहणी केली व बांधकाम अधिकारी, कंत्राटदार कंपनीच्या अधिकार्‍यांशी चर्चा करुन आठवडाभरात बांधकाम सुरू न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला.

गोंदिया शहराला जोडणारा बालाघाट-गोंदिया-कोहमारा राज्य महामार्ग क्रमांक 275 वर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे पूल ब्रिटीश राजवटीत बांधण्यात आला. पूल मुदतबाह्य झाला असतानाही पुलावरून वाहतूक सुरू होती. सुरक्षेच्या दृष्टीने तत्कालीन जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी पुलावरून वाहतूक बंद करण्याचे आदेश दिले होते. यानंतर जून, जुलै 2022 मध्ये पूल पाडण्यात आला. पूल पाडल्यानंतर नवीन पूल बांधला जाईल, अशी अपेक्षा जनता बाळगून होती. मात्र दोन लोटत असताना बांधकामाचा मुहुर्त सापडला नाही. पुलाच्या बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता 82.97 कोटींची तर निविदा किमत 47 कोटींची असून लांबी 553.25 मीटर तर रुंदी 12 मीटर राहणार आहे. नागपूर येथील सीएस कंट्रक्शन कंपनीला पुलाचे कंत्राट आहे. जानेवारीत भूमिपूजन करण्यात आले. विविध परवानग्या, तांत्रिक अडचणी दूर सारून बांधकामाला मंजुरी मिळाली असताना तसेच भूमिपूजन होऊन चार महिने होऊनही बांधकामाला सुरवातच झाली नाही.

पुलाचे बांधकाम लवकर सुरू करण्यासाठी अनेक संघटना व नागरिकांचे निवेदन मिळाले होते. यासंदर्भात शासन स्तरावर सतत पाठपुरावा केला. रेल्वे पूल बांधकाम नागरिकांचा जिव्हाळ्याचा विषय असल्याने विहित मुदतीत काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. मात्र कंपनीकडून कामात दिरंगाई केली जात आहे. पुल बांधकामाला आठवडाभरात प्रारंभ न झाल्यास आंदोलन असल्याचे आ. विनोद अग्रवाल यांनी सांगीतले.

Print Friendly, PDF & Email
Share