‘कोव्हिशिल्ड’ दुष्परिणाम प्रकरण पोहचले सुप्रीम कोर्टात, याचिका दाखल

Delhi : कोव्हिशिल्ड लसीच्या दुष्परिणामांचा अभ्यास करण्‍यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांची समिती स्‍थापन करण्‍यात यावी, अशी मागणी असणारी याचिका आज (दि.१) सर्वोच्‍च न्‍यायालयात दाखल करण्‍यात आली आहे. कोरोना लसीकरण मोहिमेदरम्यान गंभीर बाधित झालेल्या लोकांना भरपाई देण्‍यासाठी केंद्र सरकारला निर्देश देण्‍यात यावेत, अशी मागणीही ॲड. तिवारी यांनी दाखल केलेल्‍या याचिकेत करण्‍यात आली आहे.

कोव्हिशिल्ड लसीमुळे दुर्मिळ प्रकरणांमध्ये दुष्परिणाम होऊ शकतात, असा कबुलीजबाब नुकताचा ब्रिटिश फार्मास्युटिकल कंपनी ॲस्ट्राझेनेकाने ब्रिटनमधील न्यायालयात दिला आहे. याचा उल्‍लेखआज सर्वोच्‍च न्‍यायालयात दाखल केलेल्‍या  याचिकेत करण्‍यात आला आहे. तसेच काही मीडिया रिपोर्ट्सचा हवाला देण्यात आला आहे. ॲस्ट्राझेनेका कंपनीने न्‍यायालयात कबूल केले की, लसीमुळे मानवी शरीरात थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम (TTS) सारखे दुष्परिणाम होऊ शकतात. थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोममुळे शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार होऊ लागतात किंवा शरीरात प्लेटलेट्स झपाट्याने कमी होऊ लागतात.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

ब्रिटीश नागरिक जेमी स्‍कॉट यांनी ॲस्ट्राझेनेका कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. स्कॉटचा दावा आहे की, डझनहून अधिक लोकांनी कंपनीच्या कोरोना लसीविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. लस घेतल्यानंतर संबंधितांना दुष्परिणामांचा सामना करावा लागला. या सर्वंनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे. ॲस्ट्राझेनेका कंपनीने आपल्‍या कबुलीजबाबात म्‍हटलं आहे की, ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने विकसित केलेल्या कोव्हिशिल्ड लसीचे दुष्परिणाम होऊ शकतात. हे दुष्परिणाम थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोमसारखे असू शकतात. थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोममुळे शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार होऊ लागतात किंवा शरीरात प्लेटलेट्स झपाट्याने कमी होऊ लागतात.

Share