देवरी येथे कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक संप
■ समितीचे पदाधिकारी व कर्मचा-यांच्या वतीने पणन संचालक यांना निवेदन सादर
देवरी,ता.२६: सन २०१८ चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रं ६४ अन्वये महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन(विकास व विनियमन)अधिनियम १९६३ मध्ये प्रास्तावित केलेल्या सुधारणेच्या विरोधात देवरी येथील कृषि उत्पन्न बाजार समिती द्वारे एक दिवसीय लाक्षणिक संपामध्ये आज सोमवार (ता.२६ फेब्रुवारी) रोजी घेवून या संदर्भात एक निवेदन गोंदियाचे जिल्हाधिकारी मार्फत पणन संचालक,पुणे यांना पाठविण्यात आले आहे.
पाठविलेल्या निवेदनात कृषि उत्पन्न बाजार समितीने म्हटले आहे की, राज्य शासनाने दिनांक ०७/०२/२०२४ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार सन २०१८ चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक ६४ अन्वये महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मध्ये प्रस्तावित केलेल्या सुधारणेच्या अनुषंगाने राज्यातील शेतकरी,व्यापारी आणि कृषि उत्पन्न बाजार समित्यांकडुन १५ दिवसात सुचना व हरकती मागविण्यात आल्या आहेत.सदर विधेयकात प्रस्तावित केलेल्या सुधारणामुळे शेतकरी, व्यापारी अडते, हमाल, मापारी तसेच इतर संबंधीत घटकांवर व बाजार समितीच्या अस्थित्वावर परिणाम होणार आहे. त्यामुळे राज्यातील बाजार समित्यांमार्फत तसेच शेतकरी, व्यापारी, अडते, हमाल, मापारी यांचे मार्फत पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडे सदर प्रस्तावित बदलाव विरोध दर्शवुन हरकती नोंदविल्या आहेत.
उपरोक्त बाबीवर शासनाने लक्ष वेधण्याकरिता गोंदिया जिल्यातील सर्व कृषि उत्पन्न बाजार समित्यांनी सोमवार दिनांक २६.०२.२०२४ रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारलेला आहे. तरी सन २०१८ चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक ६४ अन्वये महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मध्ये प्रस्तावित केलेल्या सुधारणा करण्यात येऊ नये, तसेच महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मध्ये बदल करु नये. या अनुषंगाने देवरी येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वतीने अशा आशयाचे निवेदन शासनाला सादर केले आहे.
या संपामध्ये आणि निवेदन सादर करणा-यामध्ये देवरी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रमोदभाऊ संगीडवार,उपसभापती विजय कश्यचप,संचालक अनिलभाऊ बिसेन, सुकचंद राऊत,बबलु डोये, समितीचे सचिव लोकेश सोनुने, कर्मचारी मनिष अक्कुलवार, वैशाली साखरे, शिला शिवणकर, राकेश शहारे व विकास देशमुख आदिंचा सहभाग होता.