महोत्सवातून उलगडणार राज्यातील ‘महासंस्कृती’

गोंदिया: सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र राज्य व जिल्हा प्रशासनाच्या वतीने 12 ते 16 फेब्रुवारी या कालावधीत पाच दिवशीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन स्थानिक स्व. इंदिरा गांधी स्टेडियम येथे करण्यात आले आहे. महोत्सवाच्या माध्यमातून जिल्हा तसेच राज्यातील संस्कृतीचे आदान-प्रदान व जतन होणार आहे. महोत्सवात नामांकित कलाकार कला सादर करतील. सोबतच स्थानिक 300 कलाकारांचा सहभाग राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी प्रजीत नायर यांनी आज 9 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी तहसीलदार समशेर पठाण उपस्थित होते.

पुढे नायर म्हणाले, महोत्सवाचे उद्घाटन 12 फेब्रुवारीला सायंकाळी 6 वाजता वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या उपस्थितीत होईल. पाहुणे म्हणून खा. प्रफुल्ल पटेल, खा. सुनील मेंढे, खा. अशोक नेते, आमदार विनोद अग्रवाल, आ. विजय रहांगडाले, आ. मनोहर चंद्रिकापुरे, आ. सहसराम कोरोटे, जिद अध्यक्ष पंकज रहांगडाले, आ. अभिजित वंजारी, आ. सुधाकर अडबाले, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी प्रजीत नायर व संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय विभिषण चवरे उपस्थित राहतील. महोत्सवात 12 रोजी जागर लोककलेचा सदरात दंडार, भारुड, गोंधळ, वासुदेव व आदिवासी नृत्य. प्रसिद्ध गायक नंदेश उमप यांचा पोवाडा, मराठी आणि हिंदी गाण्याचा मुख्य कार्यक्रम होईल. 13 रोजी कवी-हास्य संमेलनात प्रसिद्ध विनोदवीर सुनील पॉल, एहसान कुरेशी, राजीव निगम व प्रसिद्ध वर्‍हाडी कवी मिरझा रफी बेग सहभागी होतील तसेच मेधा घाडगे व सहकलाकार सांस्कृतिक लावणी सादर करतील. 14 रोजी संतान हे झाडीपट्टी नाटक सादर होईल. जागर लोककलेचा सदरात स्थानिक वासुदेव लोककला नृत्य व प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांच्या मराठी हिंदी गीतांचा कार्यक्रम होईल. 15 रोजी गायिका वैशाली सामंत यांच्या मराठी, हिंदी गीत गायनाचा कार्यक्रम होणार आहे. 16 रोजी महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारा महाराष्ट्राची लोकधारा कार्यक्रम महाराष्ट्राचा महानायक अनिरुद्ध जोशी सादर करणार आहे. जिल्हावासीयांनी महोत्सवास उपस्थित राहून कलावंतांचा उत्साह वाढवावा, आपल्या संस्कृतीला अनुभवण्याचा आंनद घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रजीत नायर व जिल्हा महासंस्कृती महोत्सव आयोजन समितीने केले आहे.

सोबतच याही कार्यक्रमांची मेजवाणी

महासंस्कृति महोत्सवात 12 व 13 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 दरम्यान कब्बडी स्पर्धा, 13 फेब्रुवारीला दुपारी 12 ते 2 सेलिब्रिटी सेफ विष्णू मनोहर उपस्थितीत पाककला स्पर्धा व प्रदर्शन, 14 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 भजन स्पर्धा, दुपारी 12 ते 5 रांगोळी स्पर्धा व शुक्रवारी 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.30 वाजता महामॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. खाद्य संस्कृतीमध्ये बचतगट स्टॉल, शिवदालन मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील चित्रप्रदर्शन व हस्तकला प्रदर्शन पाचही दिवस राहणार आहे. महोत्सव सर्वांसाठी खुला व निःशुल्क असणार आहे.

Print Friendly, PDF & Email
Share