समाज बदलण्याचे प्रभावशाली माध्यम शिक्षण : उपराष्ट्रपती धनखड

गोंदिया : भारताचे पंतप्रधान केवळ कामाचा पायाच घालत नाहीत तर उद्घाटनही करतात, असे म्हटले जाते. आज मला ही संधी प्रफुल्लभाईंमुळेच मिळाली आहे. उद्घाटनही केले व वैद्यकीय शिक्षणाशी संबंधित संस्थेच्या इमारतीच्या पाया भरणीची संधी मिळाली आहे. समाज बदलण्याचे सर्वात प्रभावशाली माध्यम म्हणजे शिक्षण. समानता आणण्यासाठी आणि विषमता कमी करण्यासाठी शिक्षण हे सर्वात प्रभावी माध्यम आहे. असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले.

ते येथील धोटे बंधू महाविद्यालयाच्या प्रांगणात 11 फेब्रुवारी रोजी आयोजित सुवर्णपदक वितरण समारोह व मनोहरभाई पटेल जयंती कार्यक्रमाप्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते. यावेळी मंचकावर धनखड यांच्या पत्नी डॉ. सुदेश धनखड, राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम, खा. प्रफुल्ल पटेल, खा. सुनील मेंढे, खा. श्रीकांत शिंदे, खा. सी. एम. रमेश, राहुल कृष्णा, जिप अध्यक्ष पंकज रहांगडाले, आ. विनोद अग्रवाल, आ. विजय राहांगडाले, आ. मनोहर चंद्रिकापुरे, आ. राजू कारेमोरे आ. सहेषराम कोरोटे, गोंदिया शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष वर्षा पटेल उपस्थित होत्या. पुढे धनखड म्हणाले, मनोहरभाई पटेल यांनी जो आदर्श ठेवला, त्यांनी लावलेले रोपटे खूप मोठे झाले आहे. प्रफुल्ल पटेल व वर्षा पटेल जिद्दीने मेहनत घेत आहेत, इथे आल्यानंतर मी जे काही पाहिलं, त्यावरून मी सांगू शकतो की प्रामाणिकपणे व निष्ठेने त्यांच्या कार्यामुळे या क्षेत्रात आणखी चांगले बदल नक्कीच होत राहतील. सन 1990 पूर्वीचा काळ खूप आव्हानात्मक होता.

येथील मातीत तांदूळ पिकतो, तांदळाला मार्केटिंगची गरज आहे, शेतकरी पुढे गेला तर देश पुढे जाईल आणि पुढे जाण्यासाठी शेतकर्‍यांनी कृषी उत्पादनात मोलाची भर घालणे आवश्यक आहे. तेव्हाच शेतकर्‍याच्या स्थितीत निश्‍चितच गुणात्मक बदल होईल. पूर्वी हा भाग नक्षलवादाच्या विळख्यात होता. आता त्यात लक्षणीय घट झाली आहे. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करीत असल्याचे उपराष्ट्रपती म्हणाले. देशात आज आमुलाग्र बदल होत आहे. बदल तेव्हा होतो जेव्हा माणसाचे जीवन बदलते. प्रत्येक घरात शौचालय, नळ व नळाला पाणी गॅस सिलिंडर पोहोचवणे ही काही सोपी गोष्ट नाही, हे आज वास्तवात असल्याचेही धनखड म्हणाले. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत जन्माला आलात, संविधान निर्मात्यांनी लावलेल्या चित्रांमध्ये थोर शिवाजी महाराजांच्या चित्राचा समावेश आहे. शिवाजी महाराजांचे चित्र संविधानाच्या त्या भागात आहे जो निवडणुकांशी संबंधित आहे आणि निवडणुकांचा थेट लोकशाहीशी संबंध आहे. आपण जगातील सर्वात मोठी लोकशाही, मदर ऑफ डेमोक्रसी आहोत. 2047 मध्ये भारत जगातील सर्वोत्तम देशांपैकी विकसित भारत असेल. असा विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. लोकसभेत महिलांना एक तृतीयांश आरक्षण दिल्याने येत्या काही वर्षांत लोकसभा आणि विधानसभेत पाहायला मिळेल असेही धानकट म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आपण समाजाचे देणे लागतो या भावनेने काम करावे. तेच काम मनोहरभाईंनी केले. त्यांनी शून्यातून विश्‍व निर्माण केले. कठीण व प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण न घेतल्यामुळे त्यांना खंत होती, ती खंत त्यांनी शिक्षण संस्था काढून पूर्ण करीत गोरगरिबांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य केले. विदर्भाच्या विकासात मनोहरभाईंनी मोलाचा वाटा उचलला. आज त्यांची आठवण म्हणून मनोहर भवन उभारणीसाठी 30 कोटींच्या निधी देण्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्री यांनी केली. प्रसंगी भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी, खेळाडू, प्रगतीशील शेतकरी, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे तसेच पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणार्‍या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले. संचालन व आभार माजी आमदार राजेंद्र जैन यांनी मानले.

Share