594 शाळांचे होणार मुल्यांकन

गोंदिया : जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांचा शिक्षणचा दर्जा उंचविण्यासाठी जिल्हा परिषदेने आमची शाळा, आदर्श शाळा हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाचा मागोवा व उद्दिष्ट ठरविण्यासाठी जिल्ह्यातील 594 शाहांचे मुल्यांकन सुरु करण्यात आले आहे. अंतिम मुल्यांकनानंतर उत्कृष्ट शाळांना पुरस्कृत करण्यात येणार आहे.

गोंदिया जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभाग व तिरोडा येथील अदानी फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने 2019-20 पासून जिल्हास्तरावर आमची शाळा, आदर्श शाळा राबविण्यात येत आहे. या उपक्रमाची परिणामकरता व यशस्वीता लक्षात घेऊन 2023-24 या वर्षात उपक्रमाच्या तिसर्‍या टप्पा अदानी फाऊंडेशनच्या वतीने जिल्ह्यातील 594 शाळांमध्ये राबविण्यात येत आहे. शाळेत उपलब्ध भौतिक सुविधा, शाळेप्रती लोकसहभाग, विद्यार्थ्यांच्या लाभाकरिता राबविण्यात येणार्‍या शासकीय योजना, विविध स्पर्धा परीक्षेचे आयोजन, विद्यार्थ्यांची आकलन शक्ती यावर आधारित 100 गुणांच्या प्रश्‍नावलीद्वारे शाळांचे मुल्यांकन करण्यात येत आहे.

594 प्राथमिक शाळांचे मुल्यांकन केंद्रप्रमुखांद्वारे करुन 88 केंद्रातून प्रथम क्रमांकाच्या शाळांची निवड तालुका मुल्यांकनासाठी करण्यात येणार आहे. केंद्रातून प्रथम येणार्‍या शाळांना अदानी फाऊंडेशनतर्फे 5 हजार रुपये बक्षीस देण्या येणार आहेत. तसेच तालुक्यातून प्रथम व द्वितीय शाळांना अनुक्रमे 51 व 35 हजार रुपये व स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे. तालुकास्तरावर उत्कृष्ट ठरलेल्या शाळांची जिल्हास्तरीय उत्कृष्ट शाळेसाठी निवड होणार आहे.

Print Friendly, PDF & Email
Share