आमची शाळा आदर्श शाळा उपक्रमांतर्गत 594 शाळांचे होणार मूल्यांकन
गोंदिया : जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणार्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी, शाळेत उपलब्ध असलेल्या भौतिक सुविधा अधिक दर्जेदार व्हाव्यात तसेच शाळांमध्ये स्पर्धात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा याकरिता गोंदिया जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षण विभाग आणि तिरोडा येथील अदानी फाउंडेशन यांचे संयुक्त विद्यमाने शैक्षणिक सत्र 2019 – 20 पासून जिल्हास्तरावर आमची शाळा आदर्श शाळा उपक्रम राबविण्यात येत आहे. उपक्रमाची परिणामकारकता व यशस्वीता पाहता शैक्षणिक सत्र 2023-24 मध्ये अदानी फाउंडेशन तिरोडा यांच्या सौजन्याने तिसरा टप्पा 1 ऑगस्ट 2023 पासून जिल्ह्यातील सर्व प्राथमिक 594 शाळांमध्ये राबविण्यात येत आहे.
शाळेमध्ये उपलब्ध असलेल्या भौतिक सुविधा, शाळेप्रती लोकांचा सहभाग, विद्यार्थ्यांच्या लाभाकरिता असलेल्या शासकीय योजना, विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षा विषयी आवड निर्माण करणे, विद्यार्थ्यांची आकलन शक्ती तपासणी यावर आधारित 100 गुणांच्या प्रश्नावलीमार्फत शाळांचे मूल्यांकन करून केंद्रस्तरावर प्रथम शाळा घोषित करणे, तालुकास्तरावर प्रथम व द्वितीय क्रमांकाची शाळा घोषित करणे व जिल्हा स्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची शाळा घोषित करण्यात येणार आहे. नियोजनानुसार केंद्रस्तरीय मूल्यांकनाला सुरुवात झालेली आहे.
594 प्राथमिक जिल्हा परिषद शाळांचे मूल्यांकन केंद्रप्रमुखद्वारे करून 88 केंद्रातून 88 प्रथम क्रमांकाच्या शाळांची निवड तालुका मूल्यांकनासाठी करण्यात येणार आहे. केंद्रातून प्रथम येणार्या शाळांना अदानी फाउंडेशनद्वारा रोख 5 हजार रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे. तर तालुक्यातून प्रथम व द्वितीय शाळांना अनुक्रमे 51 हजार रुपये व 35 हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह तर जिल्हास्तरावर प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक प्राप्त करणारे शाळांना अनुक्रमे 1 लाख 21 हजार, 75 हजार व 51 हजार रोख व स्मृतीचिन्ह पारितोषिक म्हणून अदानी फाउंडेशन तिरोडाद्वारा देण्यात येणार आहे.