अदानी प्रकल्पाचा कोळसा विकून पुरविले दगड, गिट्टी ट्रकचालकांचा प्रताप

गोंदिया: कोळसा विकून त्या ऐवजी माती व गिट्टी पुरवून अदानी विज प्रकल्प व्यवस्थापनाला दोन ट्रकचालकांनी गंडा घातल्याचा प्रकार गुरूवार १४ डिसेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास उघडकीस आला आहे. रोहित पांडे (२२) रा. खडबडा, सोनवर्षा (मध्यप्रदेश) व घरभरण जगन्नाथ यादव (५८), रा. २०९ वरून आर्केट नियर लॉकिंग, इंडस्ट्रीज (ठाणे पश्चिम) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

तिरोडा येथील महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या क्षेत्रात अदानी वीज प्रकल्पामध्ये दगडी कोळसा पोहोचविण्यासाठी ट्रक क्रमांक एमएच ४० सीपी ३०११ मध्ये 1 लाख ६ हजार १६३ रुपये किमतीचा ३६ टन ३६० किलो कोळसा व ट्रक क्रमांक एमएच ४० डीएल ५०६२ मध्ये ७० हजार ३५५ रूपये किमतीचा २६ टन २४० किलो कोळसा असा ६२ टन ६०० किलो दगडी कोळसा पाठविण्यात आला होता.

ट्रकचालक रोहित पांडे व घरभरण यादव यांनी ट्रकमधील कोळसा विकून त्या ऐवजी माती, दगड व गिट्टी भरून अदानी वीज प्रकल्पाला पुरविले. हा प्रकार उघडकीस आल्याने फिर्यादी विनोद सुखदेव चव्हाण (५१), रा. तिरोडा यांच्या तक्रारीवरून तिरोडा पोलिसांनी दोन्ही ट्रकचालकांवर भादंविच्या कलम ४०८, ४०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दलालवाड करीत आहेत.

Share