अमृत महोत्सवानंतरही देवरी तालुक्यातील अनेक गावे एसटी सेवेपासून वंचित

◼️ निवडणुकीपुर्ते जनप्रतिनिधिनेंचे लॉलीपॉप

देवरी ◼️स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही देवरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये राज्य परिवहन महामंडळाची बस पोहोचली नाही. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांसह विद्यार्थ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी नागरिकांना खाजगी वाहनांनी अधिकचा पैसा मोजून प्रवास करावा लागत आहे. देवरी तालुका दुर्गम, जंगल व्याप्त, आदिवासी बहुल, नक्षल प्रभावित आहे. तालुक्यातील अनेक गावांत एसटीची सेवा अजूनही पोहचली नाही. ओवारा चांदलमेटा, मुरपार, कोसबी, गड़ेगांव, तुमड़ीकसा, मुरमाडी, पलानगाँव आदी गावांसह इतर अनेक गावांत एसटी बस सेवा नाही.

विशेष म्हणजे स्थानिक जनप्रतिनिधी व राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष दिले तर बहुतांश गावात एसटी बस सुरू होऊ शकते. देवरी हे तालुका मुख्यालय आहे. येथे नेहमी शासकीय कामानिमित्त तालुक्यातील नागरिकांची वर्दळ असते परंतु दळणवळणाची साधने नसल्याने नागरिकांना त्रास सहन करून तालुका मुख्यालय पोहोचावे लागते. एसटीचा प्रवास सुरक्षित, आरामदायक व कमी खर्चाचा समजला जातो. महिला, विद्यार्थी, अपंग, ज्येष्ठ नागरिक, विविध आजाराने ग्रस्त नागरिकांसाठी एसटीच्या सवलतीच्या योजना आहेत. परंतु विविध मार्गावर एसटीची सेवा नसल्याने तालुक्यातील नागरिकांना एसटीच्या सवलतीच्या सेवांनाही मुकावे लागते. निवडणुका आले की नेतेमंडळी मतदारांना एसटीची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन देतात. मात्र निवडणूक झाली, जिंकून आले की जनतेच्या समस्यांच्या जणू त्यांना विसरच पडतो. तालुक्यातील लोकप्रतिनिधी व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकार्‍यांनी तालुक्यातील नागरिकांची गरज लक्षात घेता एसटी सेवेपासून वंचित असलेल्या गावांमध्ये एसटीची बस सेवा सुरू करावी, अशी मागणी विद्यार्थी, पालक, प्रवाशांसह परिसरातील नागरिकांची आहे.

Print Friendly, PDF & Email
Share