गावे आदर्श करण्यासाठी वेळेचे बंधन पाळा- अनिल पाटील
गोंदिया : जिल्ह्यातील सर्व गावे हागणदारी मुक्त झाली. आता गावे हागणदारीमुक्त अधिक म्हणजेच ‘ओडीएफ प्लस’ करायची आहेत. त्यासाठी सांडपाणी व घनकचर्याच्या व्यवस्थापनावर सर्वाधिक भर आहे. त्यादृष्टीने नियोजन करून गावे आदर्श करण्यासाठी वेळेचे बंधन पाळा, असे आवाहन जिल्हा परिषद गोंदियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी केले.
तिरोडा तालुक्यातील बोदलकसा येथे 5 डिसेंबर रोजी पार पडलेल्या ओडीएफ प्लस कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंदराव पिंगळे, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गोविंद खामकर, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुमित बेलपत्रे मंचावर उपस्थित होते. प्रसंगी अनिल पाटील यांनी विविध विषयांचा आढावा घेतला. ते पुढे म्हणाले, वैयक्तीक शौचालय ही कौटूंबिक गरज आहे. त्यामुळे शासनाच्या धोरणानुसार प्रत्येक कुटूंबाला शौचालय देण्यात आले. तरीही वैयक्तीक शौचालयांची मागणी वाढत आहे. त्यामुळे अर्जदारांकडे प्रत्यक्ष पाहणी करूनच पात्र व्यक्तीलाच लाभ देण्याचे निर्देश त्यांनी कार्यशाळेत दिले.
आनंदराव पिंगळे यांनी, वैयक्तीक शौचालय, सार्वजनिक शौचालय, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टीक बंदी आदी विषयांचा आढावा घेवून भौतिक व आर्थिक प्रगतीवर भर देण्याचे आवाहन केले. गोविंद खामकर यांनी, 15 व्या वित्त आयोग आणि ग्रामपंचायत अंतर्गत नियोजन आराखड्यांवर मार्गदर्शन केले. सुमित बेलपात्रे यांनी जलजीवन मिशनचा धावता आढावा घेतला. दिशा मेश्राम यांनी, पीपीटी सादरीकरणातून ‘ओडीएफ प्लस’ बाबत, सूर्यकांत रहमतकर यांनी सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, भागचंद रहांगडाले यांनी, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाची माहिती दिली. संचालन अतुल गजभिये यांनी केले.