कडीकसा येथे प्रकल्प स्तरीय क्रिडा स्पर्धेचे आयोजन

देवरी ◼️आजच्या घडीला क्रीडा क्षेत्रात आपल्या आदिवासी समाजातील विद्यार्थी कुठेही कमी नसून क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रात प्रगतीपथावर आहे. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये देवरी प्रकल्प प्रथम स्थानावर असून प्रकल्प अधिकारी यांचे प्रयत्नाने हे शक्य झाले असून आपण आश्रमशाळेतील गुरूजनांनी यात आणखी प्रतिसाद दिल्यास आपल्या आदिवासी समाजातील विद्यार्थी क्रीडा क्षेत्राबरोबर अभ्यासात सुद्धा पुढे राहतील असे प्रतिपादन या क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांनी केले.
आमदार कोरोटे हे शासकीय व अनुदानित आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी व त्यांना आपली कला कौशल्य दाखवण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास, प्रकल्प कार्यालय देवरी अंतर्गत येत असलेल्या ११ शासकीय व २३ अनुदानित आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांकरीता प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन रविवार (ता.५ नोव्हेंबर ) रोजी शासकिय आश्रमशाळा कडीकसा येथे करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते.
या स्पर्धेचे उद्घाटन या क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे.यांच्या अध्यक्षतेखाली व देवरीचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले.
या प्रसंगी देवरी चे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी आपल्या प्रमख भाषणात म्हटले की,आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने मागील दोन वर्षापासून शैक्षणिक विकासामधून भविष्यवेधी शिक्षण विचार अंतर्गत NEET, JEE, एम. एच. टी. सी. इ. टी. तसेच कायद्याचे शिक्षणाकरिता प्रथमच देवरी प्रकल्प अंतर्गत येत असलेल्या सर्व आश्रम शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींना मार्गदर्शन प्रशिक्षण देण्यात येत आहे. यात वीर बिरसा मुंडा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती निमित्त सतत १४-१५ तास अभ्यास करणारे वसतिगृहातील विद्यार्थी यांपैकी २३ विद्यार्थी सहकारी नोकरीमध्ये लागलेले आहेत तसेच डॉक्टर इंजिनियर करिता १५० विद्यार्थ्यांचे विशेष शिकवणी वर्ग सुरू असून यामुळे देवरी प्रकल्पाची विद्यार्थी समोर जाताना दिसून येतील. तसेच मागील नऊ वर्षानंतर प्रथमच प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धा देवरी प्रकल्प द्वारे आयोजित करण्यात आलेला असून आपल्या सर्वांच्या प्रयत्नाने सदर स्पर्धा यशस्वी होईल याची मी ग्वाही देतो असे म्हटले.
सदर उद्घाटन कार्यक्रमास पं.स.च्या सभापती अंबिकाताई बंजार, पं.स.सदस्य रणजीत कासम, कडीकसाचे सरपंच रमसीलाबाई कोरेटी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनबोध कुंभरे,एम.पी.एस.सी निवड समिती चे सह आयुक्त स्वप्निल वालदे, गनुटोलाचे सामाजीक कार्यकर्ता चैनसिंग मडावी ,ईस्तारीचे सोहन चौरे , कडीकसाचे उपसरपंच अशोक मराठी , डॉ.सोनबोईर, शासकीय आश्रम शाळेतील मुख्याध्यापक श्री.बोरकर सर, श्री. बोंतावार सर, श्री. चांदेवार सर, श्री.मासळकर सर, श्री.कुरुसुंगे सर, श्री. उईके सर यांच्यासह आश्रमशाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी- विद्यार्थींनी आणि गावकरी बहुसंख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे संचालन कडीकसा शासकिय आश्रमशाळेचे शिक्षक डी. ए. मेश्राम यांनी केले तर प्रास्ताविक देवरीचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी तथा क्रिडा समन्वयक विजय मेश्राम सर यांनी केले. आणी उपस्थितांचे आभार कडीकसा शासकिय आश्रमशाळेचे मुख्याध्यापक पी. व्ही. भोयर सर यांनी मानले.

Share