बालमृत्यु, मातामृत्यु कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी जनजागृती वाढवा

गोंदिया ◼️ जिल्ह्यातील अतिदुर्गम आदिवासी भागातील समस्या व अडचणी प्राध्यान्याने सोडविण्यास सर्व विभांगाने एकत्रित सहकार्याने काम करणे गरजेचे आहे. आदिवासी गावातील आरोग्यविषयक निर्देशांक उंचावणे, लोकांचे क्रियाशिल आयुष्य वाढविणे, आदिवासी गावांमध्ये बालमृत्यु, मातामृत्यु व कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी जनजागृती वाढविणे, शासकिय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी संबंधित यंत्रणेना केली.

जिल्हास्तरीय गाभा समितीची सभा शुक्रवार 6 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. सभेला मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटिल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमरीश मोहबे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश सुतार, शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी संजय गणविर, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. निरंजन अग‘वाल, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. नितीन कापसे उपस्थित होते. नवसंजीवनी योजने अंतर्गत मातृत्व अनुदान योजना, भरारी पथक योजना, दाई बैठक योजना, पाणी नमुने तपासणी, मान्सुनपुर्व व पश्चात करावयाच्या उपाययोजना, सँम व मॅम या मुलांना आहार सुविधा व बुडीत मजुरीपोटी अनुदान योजना, माहेरघर योजना, आरोग्यविषयक प्रतिबंधात्मक उपाययोजना अशा विविध बाबींवर सभेत चर्चा झाली. नवसंजीवनी आदिवासी भागात गरोदर मातांची नियमित आरोग्य तपासणी व्हावी व त्यांना सुयोग्य आहार वेळेत उपलब्ध व्हावा तसेच त्यांना गरोदरपणात व नंतर विश्रांती मिळावी यासाठी 2009-10 पासुन मातृत्व अनुदान योजना सुरु केलेली असुन सरकारी आरोग्य संस्थेत प्रसुती होणार्‍या मातांना 400 रुपये रोखीने व 400 रुपयांची औषधी याप्रमाणे प्रत्येक मातेला 800 रुपये येत आहे. दुर्गम भागातील माता व बालकांना औषधोपचार वेळीच व जवळच उपलब्ध होण्यासाठी मानसेवी डॉक्टर योजना ( भरारी पथक) अंतर्गत अंगणवाडी मुलांची तपासणी, आजारी मुले, गरोदर, स्तनदा मातांची तपासणी, हिवताप रक्त नमुने, पिण्याचे पाणी-स्त्रोत तपासणी, आश्रमशाळेतील मुलांची तपासणी अशा आरोग्यविषयक बाबी जिल्ह्यात राबविण्यात येत असल्याचे डॉ. वानखेडे यांनी सांगीतले. सभेला निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. बी. जयस्वाल, जिल्हा साथरोग तज्ञ डॉ. सुशांकी कापसे, बालरोग तज्ञ डॉ. सुनिल देशमुख, उपशिक्षणाधिकारी अनिल चव्हाण, डॉ. ईशान तुरकर, डॉ. प्रशांत तुरकर,डॉ. सलिल पाटिल सर्व ग‘ामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share