उत्सव सौहार्दपूर्ण वातावरणात साजरे करा : पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे

गोंदिया ◼️तान्हा पोळा, मारबत, गणेशोत्सव, ईद व शारदा उत्सव सौहार्दपूर्ण वातावरणात साजरे करण्याचे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी नागरिकांना केले. सामाजिक एकोपा, शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याची सर्वांनी खबरदारी व जबाबदारी घ्यावी तसेच ध्वनीप्रदुषण, वायुप्रदुषण टाळण्यावर भर देण्यात यावा असे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. उपजिल्हाधिकारी चंद्रभान खंडाईत, निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील, वरुणकुमार सहारे, उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर व शांतता समितीचे सदस्य यावेळी उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, समाज प्रबोधन व सामाजिक ऐक्य या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात झाली. ही परंपरा यापुढेही कायम ठेवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. गोंदिया जिल्हा हा शांतताप्रिय जिल्हा असून येऊ घातलेले सर्व उत्सव शांततेत व सौहार्दपूर्ण वातावरणात साजरे करावेत असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र शासनाने आवाहन केल्याप्रमाणे पर्यावरण पुरक गणेशोत्सव स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळांनी सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले. गणेशोत्सव व ईद हे सण सोबतच येत असल्यामुळे शांतता समितीच्या सदस्यांची जबाबदारी अधिक वाढली आहे. कायदा व सुव्यवस्था कायम राहील या अनुषंगाने सदस्यांनी जनजागृती करावी, अनेक सण उत्सव एकाचवेळी आल्याने पोलीस यंत्रणेवरील ताण वाढणार आहे. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे असेही ते म्हणाले.

अफवांवर विश्‍वास ठेवू नका…

उत्सवाच्या काळात समाज माध्यमातून सामाजिक तेढ निर्माण करणार्‍या पोस्ट व खोट्या बातम्या काही लोक पसरविण्याची शक्यता असते. अशा पोस्ट खात्री केल्याशिवाय शेअर करू नका. कुणाच्या भावना दुखावतील व त्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था बिघडेल अशी कृती आपल्या हातून घडू नये यासाठी नागरिकांनी सजग रहावे असे जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे म्हणाले.

परवानगीसाठी एक खिडकी योजना

गणेशोत्सव मंडळांना लागणार्‍या सर्व परवानग्या मिळण्यासाठी नगरपालिकेने एक खिडकी योजना सुरू केली असून परवानगीमध्ये नमूद अटी व शर्तीनुसार कार्य करण्याचे आवाहन मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण यांनी केले. रहदारीचा अडथळा होणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी. मंडपात अग्निशमन यंत्र बसविण्यात यावे असेही चव्हाण म्हणाले. आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी महत्वपूर्ण सूचना केल्या.

Print Friendly, PDF & Email
Share