गोंदिया जिल्हात 1,599 अतितीव्र कुपोषित बालके, आकडे चिंताजनक

गोंदिया ◼️ एकही बालक कुपोषित राहता कामा नये व देश कुपोषणमुक्त करण्यासाठी सरकारकडून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात आहे. यातंर्गत जिल्ह्यातही कुपोषणमुक्तीसाठी प्रशासन प्रयत्नरत आहे. मात्र, जिल्ह्यातील कुपोषित बालकांचा आकडा धक्कादायक आहे. जिल्ह्यातील 8 तालुक्यांमध्ये 1 हजार 599 अतितीव्र कुपोषित बालके आढळून आल्याचे सांगितले जात आहे.

शासनातर्फे कुपोषणमुक्तीसाठी विविध उपाययोजना राबविल्या जात असून कोट्यवधीचा निधी उपलब्ध केला जात आहे. गरोदर स्त्रिया, स्तनदा माता आणि 3 वर्षापर्यंतच्या बालकांना पौष्टिक आहार आणि इतर पौष्टिक पदार्थ पुरवले जातात. अंगणवाडी केंद्रांमधील लाभार्थी बालकांना अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून पोषण आहार दिला जातो. एकही बालक कुपोषित राहता कामा नयेत, हा यामागील मुख्य उद्देश. मात्र, हा उद्देश साध्य होत नसल्याचे या आकडेवारीवरून अधोरेखित होत आहे. पोषण आहार आणि कुपोषण निर्मूलन योजनांवर कोट्यवधी रुपये खर्च केले जात असले तरी कुपोषित बालकांची संख्या कमी होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. गोंदिया जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामीण भागात 1 हजार 599 बालके कुपोषित आढळून आली आहेत. त्यात गोंदिया शहर क्रमांक 1 मध्ये 127, क्रमांक 2 मध्ये 407, अर्जुनी मोरगाव तालुक्यात 223, सालेकसा 93, देवरी 278, सडक अर्जुनी 109, आमगाव 79, तिरोडा 230 व गोरेगाव तालुक्यात 53 बालकांचा समावेश आहे. कुपोषित बालकांची ही आकडेवारी निश्‍चितच चिंताजनक आहे.

कुपोषण निर्मूलनाकरिता महीला व बाल विकास विभागाकडून वर्षभर कार्यक्रम राबविले जातात. अशा बालक व मातांना प्रोटीनचे डबे घरपोच दिले जातात. आशा सेविकांकडून त्यांची वेळोवेळी माहिती घेतली जाते. परंतु ग्रामीण भागातील पालक आपल्या कामात व्यस्त असल्यामुळे बालकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे या आकडेवारीवरून दिसून येते. ही संपूर्ण प्रक्रिया अखंडित चालणारी आहे. विभागाकडून यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती महिला व बालकल्याण विकास अधिकारी प्रदीप गणवीर यांनी दिली.

Share